केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेला सुरुंग? अनोळखी तरुण सुरक्षा व्यवस्था भेदून घुसला!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – केंद्रीय गृहमंत्री तथा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेले भाजप नेते अमित शाह यांच्या मुंबई दौर्यात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेलाच सुरुंग लावत एक तरुण घुसल्याचे आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर असताना हा तरुण सुरक्षा कडे भेदत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. तसेच, हा तरूण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील खासदाराचा पीए असल्याचा दावा करणार्या या व्यक्तीचे नाव हेमंत पवार असे असून, तो ३२वर्षीय आहे. त्याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पवार हा मूळचा धुळ्याचा असून, एका खासदाराचा पीए असल्याचा दावा करत आहे. त्याला मंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा होती. प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी हे फोटो तो वापरणार होता असा संशय आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ४ आणि ५ ऑगस्ट रोजी मुंबई दौर्यावर होते. या दरम्यान त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे आणि वांद्रे येथील भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळातील गणरायाचे दर्शन घेतले होते. अमित शाह यांच्या सुरक्षितेची काळजी मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती. मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचेही शाह यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेतली होती. मात्र, या दरम्यान एक व्यक्ती शाह यांच्या भोवती वावरत होती. आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे स्वीय सचिव असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, मंत्रालयातील एका अधिकार्याला या व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या व्यक्तिला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. आरोपीचे नाव हेमंत पवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी पवार याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शाह हे सोमवारी मुंबई दौर्यावर असताना गिरगावात पोलीस बंदोबस्त पाहत असताना ही घटना घडली. सोमवारी शाह हे मलबार हिलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानांना भेट देणार होते. ते फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा ब्लेझर घातलेला एक व्यक्ती दिसला. त्यांनी गृह मंत्रालयाचे ओळखपत्रही लावले होते. ‘तो व्यक्ती प्रतिबंधित परिसरात फिरत होता. काही तासांनंतर शाह हे एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले, तेव्हा तो व्यक्ती तेथेही तेथे दिसला. तेव्हा त्या व्यक्तीची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव हेमंत पवार असल्याचे सांगितले आणि आपण केंद्रीय एजन्सीचा सदस्य असल्याचे सांगितले. परंतु, ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आता या तरुणाची पोलिस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.