– अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस गोपनीय बैठक
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा मुंबईत सुरु असतानाच, अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे या चर्चेला दुजोरा मिळू लागला आहे. आधीच नवी दिल्लीतील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेकांचे राजीनामे पडले आहेत. तर महाराष्ट्रातील काँग्रेसमध्येदेखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे माजी दोन नेते लवकरच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार असल्याची चर्चाही मुंबईत रंगली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, शिंदे-फडणवीस सरकारमधील समन्वयक अशीष कुलकर्णी यांच्या घरी उभ्या-उभ्या भेट झाली, असे स्पष्टीकरण चव्हाणांनी दिले आहे. ते म्हणाले, की आशीष कुलकर्णींच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. आता ही भेट गणपतीदर्शनामुळे घडलेला योगायोग होता, की कुलकर्णी यांनी समन्वयाने भेट घडवून आणली, अशी चर्चादेखील रंगली होती.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाणांसह चार ते पाच आमदार उशिराने सभागृहात पोहोचले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही अदृश्य हात आमच्या पाठी असल्याचे सूचक विधान केले होते. फडणवीसांचे हे विधान आणि चव्हाण यांचे सभागृहात उशिरा पोहोचण्याचा त्यावेळी संबंधही लावला गेला होता. दुसरीकडे, काँग्रेसमधील गोंधळ आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून जावे लागल्यानंतर भाजप नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याचे आवतन दिले होते. त्यावरही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.
काँग्रेसचा मोठा गट लवकरच भाजपमध्ये?
दरम्यान, नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, दुसर्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर दुसर्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यात येणार असून, त्यातील दोन आमदारांना मंत्रिपद देणार असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसच्या आमदारांना फोडल्यानंतर दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच, भाजपचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यामध्ये ४३ मंत्री असतात. त्यापैकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसहीत शिवसेना-भाजपाचे प्रत्येकी ९ असे २० मंत्री सध्या मंत्रिमंडळात असून, लवकरच अन्य २३ मंत्र्यांचा समावेश होईल, असे सांगितले आहे.
——————-