– मिसाळवाडीतील श्रीगजाननभक्त प्रल्हादभाऊ कोलते यांच्या गवळणीवर नेटकरी भाळले!
चिखली (एकनाथ माळेकर) – चालत्या मालवाहू वाहनात ‘छूम छनन पायी वाजे पैजन…’ ही सुमधुर आणि तितक्याच खड्या आवाजात गवळण म्हणत प्रवास चालू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे भाविक प्रवासी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी जात असल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. अधिक चौकशी केली असता, गवळण गाणारे भाविक चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील श्री गजाननभक्त प्रल्हादभाऊ कोलते हे असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या खड्या आवाजातील गवळणीवर नेटकरी चांगलेच भाळले आहेत.
खड्या आणि सुमधुर आवाजाची नैसर्गिक देणगी मिळालेले प्रल्हादभाऊ कोलते हे निस्सिम श्री गजाननभक्त आहेत, एका मालवाहू गाडीतून ते शेगावला जात असताना मिसाळवाडी येथील पाटबंधारे कर्मचारी निवृत्ती तथा ज्ञानेश्वर झाल्टे यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि व्हायरल केला. काही क्षणात तो सोशल मीडियावर चांगलाच पसंतीस पडला आहे. मूळ गवळण ही –
छुम छुम छनन बाजे मैया पाओ पैजनिया,
पाव पैजनिया मैया पाव पैजनिया मैया
ही हिंदीतील असली तरी, त्यांनी छूम छनन पायी वाजे पैजन, अशी तिचे आपल्या बोली भाषेत भाषांतर करत तिला स्वरसाज चढवला आहे. कोणत्याही वाद्यांशिवाय ते खड्या आवाजात ही गवळण गाताना दिसतात, आणि त्याला वाहनाच्या प्रवासाचे नैसर्गिक संगीत आपोआप प्राप्त झाल्याने ती कर्णमधूर ठरली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला हा व्हिडिओ निवृत्ती झाल्टे यांनी शूट केला होता. त्यांनीच तो व्हायरल केला, आणि अनेकांना तो पाहता आला.
मिसाळवाडी येथील गजानन विश्वनाथ मिसाळ यांच्या मालवाहतूक गाडीमध्ये संत गजानन महाराज शेगाव येथे दर्शनासाठी ही मंडळी चालली असता, प्रल्हादभाऊ कोलते यांना भक्ती गीत गवळण गाण्यासाठी झाल्टे यांनीच आग्रह केला होता. त्यावर त्यांनी गवळण म्हणतो असे सांगितले, त्यानंतर त्यांनी गवळण गाण्यास सुरुवात केली असता त्यांच्या गवळणीचा व्हिडिओ निवृत्ती तथा ज्ञानेश्वर झाल्टे यांनी रेकॉर्ड केला. हाती आलेल्या माहितीनुसार, काही क्षणात हा व्हिडिओ तब्बल लाखाच्यावर दर्शकांनी पाहिला आहे. हा मूळ व्हिडिओ येथे ब्रेकिंग महाराष्ट्रच्या दर्शकांसाठी देत आहोत.