– गोरगरिबांना लूटणार्या बॉण्डविक्रेत्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन – भाई विजयकांत गवई
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली येथे शंभर रुपयाचा बॉण्डपेपर तब्बल दिडशे रुपयांना विकला जात असून, बॉण्डविक्रेते सर्वसामान्य नागरिकांसह गोरगरिबांची दिवसाढवळ्या लूट करून सरकारशी केलेल्या कराराचा भंग करत आहेत. या बॉण्डविक्रेत्यांकडून सुरु असलेली लूट कधी थांबणार, त्यांच्यावर अचानक छापे टाकून, व रितसर गुन्हे दाखल करून त्यांना अटक होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान, आज रिपब्लिकन सेनेच्यावतीने चिखली तहसीलदारांना निवेदन देत, जादा दराने बॉण्ड विक्री करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी व त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
चिखली जुन्या तहसील येथे १०० रुपयांचा बॉण्डपेपर हा विक्रेते ११० ,१२० आणि १५० रुपयांमध्ये खुलेआम विकत आहेत. गोरगरीब नागरिकांना, शेतकरी, शाळेतील विद्यार्थी व मजूरवर्ग तसेच विधवा महिला, निराधारांना विविध शासकीय कामांसाठी हा बॉण्डपेपर लागत असतो. त्यांना नाईलाजाने तो जादादराने खरेदी करावा लागत असून, यात गोरगरिबांचे लूट सुरु आहे. विविध शासकीय कामे, योजनांचा लाभ घेण्यासाठी शंभर रुपयांचाच बॉण्ड पेपर लागत असल्याने, त्याचा गैरफायदा घेऊन विक्रेते गोरगरिबांची अक्षरशः छळवणूक करून खुलेआम लूट करत आहेत. तसेच, विक्रेत्यांच्या दांडगाईमुळे कुणीही गोरगरिब व्यक्ती हा चिखली तहसीलदार, उपकोषागार, दुय्यम निबंधक अधिकारी यांच्याकडे तक्रार करत नाही. तसेच, हे अधिकारीदेखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत. ही बाब माहिती होताच, रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी चिखली तहसीलदार यांना निवेदन देऊन, उपकोषागार अधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालय यांनाही निवेदन देण्यात आले, व जादादराने १०० रुपयांचा बॉण्ड पेपर विकणार्यांवर त्वरित कारवाई करून, त्यांचे लायसन रद्द करण्यात यावे, काही विक्रेते हे त्यांच्या घरूनच १०० चा बॉण्ड पेपर हा १५० आणि २०० रुपयांनादेखील विकतात व दुप्पटीने पैसे लाटत आहेत, याकडेही अधिकार्यांचे लक्ष वेधण्यात आले.
जेथे बॉण्डपेपर विकले जातात, त्या ठिकाणी दुय्यम निबंधक अधिकारी यांनी किमतीबाबत व तक्रार असल्यास तक्रार कुठे करावी, याबाबत जाहीर फलक लावावेत, तसेच, १०० रुपयांचा बॉण्ड पेपर हा त्याच किमतीला मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोरगरिबांची लूट थांबली नाही तर रिपब्लिकन सेनेच्यावतीने उपनिबंधक कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीम भाई, चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने, कामगार नेते सुरेशभाऊ इंगळे, शहराध्यक्ष सुनील सोळंके, महिला उपाध्यक्षा उषाताई गवई, शहर कार्याध्यक्ष सतीश इंगळे, दीपकभाऊ जाधव, संजय मोहिते, लखन कुसळकर, गजराज जाधव व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते, महिला व पुरुष उपस्थित होते.