▪️टायगर अभी जिंदा है..!
खऱ्या म्हणजे उध्दव ठाकरे पक्षप्रमुख असणाऱ्या शिवसेनेविरुध्द ‘प्रतापगडा’ वरुनच पहिली ललकारी ठोठावण्यात आली. तत्कालीन संपर्कप्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी पेरणी करता करता, त्यांच्या समर्थक २ शिवसेना आमदारांना शिंदे गटात पाठवून बंडाची पेरणी केली. नंतर सिंदखेडराजाचे माजी आमदारही गेले, अन् यथावकाश १२ आमदारांसोबत प्रतापरावंही ‘आमचीच शिवसेना खरी’ सांगत शिंदे गटात डेरेदाखल झाले. खासदारांना वाटलं होतं, ते शिंदे गटात आले म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच शिवसेना शिंदे गटात आली. जिल्हा सोडाच, पण त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रतापगडातील शिलेदारही सुरुवातीला त्यांच्यासोबत आले नाही. आतातर गडांतर्गत प्रतापगडाला हादरा देण्याचे काम शिवसेनेतूनच सुरु झाल्याने, जिथे ठाकरे शिवसेना विरुध्द शिंदे शिवसेना.. अशा राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे.
अभेद्य प्रतापगड, म्हणजे मेहकर विधानसभा मतदार संघ. ३ दशकांपासून त्याला कोणी आव्हान देवू शकले नाही. ‘प्रतापराव बोले, अन् मतदार संघ हले..’ अशीच परिस्थिती. मतदार संघ राखीव झाल्यावर डॉ.संजय रायमुलकर आमदार तर आमदार असणारे प्रतापराव जाधव २००९ नंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघातून खासदार बनले, अन् पुढे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून बुलडाणा जिल्हा शिवसेनेचे सर्वेसर्वा. ‘एबी फॉर्म’ साधारणत: मातोश्रीवरुन दिल्या जातात, पण प्रतापरावांनी ते मेहकरात आणून घरातून दिले. याचाच अर्थ प्रतापराव अन् शिवसेना, हे हुकूमी समीकरण!
खा.प्रतापराव जाधव यांना शिवसेनेत बंड झाल्यानंतर, शिवसेना पदाधिकाऱ्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी मेहकरलाच बैठक बोलवावी लागली. दिल्लीत शिंदे गटात दाखल झाल्यानंतर, सिंदखेडराजा मार्गे मेहकरलाच यावे लागले. युवा सैनिकांशी संवाद साधण्यासाठी सुपूत्र ऋषी जाधव यांच्या माध्यमातून मेहकरलाच मेळावा घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात, काही काळ का होईना.. उध्दव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांना घरातूनच आव्हान मिळाल्याची परिस्थिती निर्माण झाली. नगराध्यक्ष राहून गेलेले संजय जाधव यांनी ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकातून धमाका घडवून आणला होता, अर्थात पुढे हे पेल्यातले वादळ शमले असे वाटत असतांना.. पुन्हा आशिष रहाटेंचा झंझावात मेहकरात एन्ट्री करत असतांना, त्या मेळाव्याच्या बॅनरवर संजय जाधव झळकले.. पुन्हा रात्री उशीरा सोशल मिडीयावर दुसरे बॅनर टाकून हा विषय जाधव परिवारातून बंद करण्यात आला. अर्थात विषयावर पडदा पडला, पण पडद्यामागे काहीतरी विषय झाल्यानंतरच!
‘त्याच’ वृंदावन लॉन्सवर सोमवार ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी शिवसेनेचा मेळावा पार पडला. अर्थात या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमल्याने, ‘प्रतापगडाला हादरे’ वगैरे वगैरे.. अशा चर्चा बुलडाणा जिल्ह्यासह प्रामुख्याने मेहकर मतदार संघात सुरु झाल्या. जिल्ह्यात शिवसेनेचे संस्थापक असलेले दिलीपराव रहाटे, की ज्यांना ‘धर्मवीर’ संबोधल्या जायचे.. त्यांचे सुपूत्र म्हणजे आशिष रहाटे. आशिषने मेहकर मतदार संघात संपर्क अभियान सुरु करुन, शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखांविरोधात आघाडी उघडली असलीतरी.. ते प्रतापरावांविरुध्द थेट न बोलता वडीलांचा त्याग सांगत शिवसेना संवर्धनासाठी भावनिक साद घालतात. कोणत्याही पदाची अभिलाषा न ठेवता हे काम चालू असून, शिवसेनेसोबत गद्दारी करण्याचा विचारही करु शकत नाही.. असे आशिष रहाटे बोलतात. तर याच मेळाव्यात जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी बाळासाहेबांना दैवत संबोधून मरेपर्यंत शिवसेना सोडणार नसल्याचे उद्गार काढले. बुधवत यांच्याबाबतीत नमूद करायचे तर शिवसेनेतील त्यांचे पहिले गॉडफादर आनंदरावअडसूळ तर दुसरे खा.प्रतापराव जाधव. मात्र हे दोघेही शिवसेना सोडून शिंदे गटात गेले असलेतरी, जालींधर बुधवत मूळ शिवसेनेतच कायम राहून ज्या शिवसेनेतून राजकीय आयुष्याची सुरुवात केली, त्याच शिवसेनेत राजकीय आयुष्याच्या शेवटपर्यंत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या मेळाव्यात सर्वाधीक गाजलेले माजी जिल्हाप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांचे खणखणीत भाषण. त्यांनी थेट प्रतापरावावरच तोफ डागली. भूमिपुत्र असणारे हे खासदार ५ हजाराचा चश्मा, १५-२० हजाराचा ड्रेस तर पायात महागडे बुट घालून पेरणी करतात.. हे खरे भूमिपुत्र की महाबीजच्या थैलीची बंडी करुन अंगात घालणारा शेतकरी भूमिपुत्र? असा सवाल त्यांनी विचारुन थेट प्रतापगडावरच हल्लाबोल केला. त्यामुळे या मेळाव्यात गाजले ते, नरुभाऊंचेच भाषण.
शिवसेनेच्या या मेळाव्याने, प्रतापगडावर खऱ्याअर्थाने आता राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. आतापर्यंत थेट पुढे न येणारे, या मेळाव्याच्या माध्यमातून पुढे आल्याने.. ते खासदार व आमदारांचे ‘लक्ष्य’ ठरु शकतात. मात्र काहीही असलेतरी, ठाकरे शिवसेना विरुध्द शिंदे शिवसेना या दोघांकडूनही झाले ते.. प्रतापगडच लक्ष्य!
▪️टायगर अभी जिंदा है..!
प्रा.नरुभाऊ खेडेकर हे एकेकाळी शिवसेनेतील ‘वाघ’ संबोधल्या जायचे. २००२ पर्यंत ते शिवसेना जिल्हाप्रमुख होते. पुढे स्थानिक नेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांची भूमिका ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशीच बांधेल राहीले. ‘शिवराणा’ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसमध्ये असतांनाही तिथीनुसार शिवजयंती, दसरा मेळावा व बाळासाहेब ठाकरेंप्रती श्रध्दा असणारे कार्यक्रम सातत्याने राबविले. २०१९ पुर्वीच त्यांनी शिवसेनेत घरवापसी केली. परंतु प्रतापराव जिल्हा शिवसेनेचे सर्वेसर्वा असल्याने, त्यांना जिल्हाभर त्यांच्या नेतृत्वाची चमक दाखवण्याची संधी मिळू शकली नाही. मात्र शिंदे गटाने बंड करताच, शिंदेविरोधात शिवसैनिकांना घेवून नरुभाऊ चिखलीच्या रस्त्यावर उतरले. ‘निम का पत्ता कडवा है..’ अशा घोषणा व शिंदे बंडखोरी केलेल्या आमदारांविरोधात त्यांनी दिल्या. बुलडाण्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यातही त्यांनी आ.डॉ.संजय रायमुलकर व आ.संजय गायकवाड यांच्यावर ‘निष्ठा व विष्ठा’ अशा आशयाची तोफ डागली. प्रतापरावांनी मेहकरात जी सेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, त्यातही त्यांनी शिंदे गटात प्रतापरावांनी जावू नये.. जे गेले ते गद्दार, तुम्ही गेलेतर तुम्हाला महागद्दार संबोधण्यात येईल.. अशी भूमिका जाहीरपणे मांडली होती. तर आताही मेहकरच्या मेळाव्यात त्यांनी थेट भूमिपुत्रावरुन प्रतापरावांवर डागलेली तोफ मोठ्या टाळ्या मिळवून गेली. एकूणच, नरुभाऊंची ही भूमिका पाहून शिवसेनेत जी चर्चा त्यांच्याबाबतीत सुरु झाली ती.. टायगर अभी जिंदा है!!