KARAJAT

ग्रामसेवकांचे मारहाणप्रकरणी काम बंद; उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा!

कर्जत (प्रतिनिधी) : मिरजगाव येथे करवसुली प्रसंगी प्रभारी ग्रामसेवक शरद कवडे हे कर्मचाऱ्या सह गेलेले असताना त्यांना शुक्रवारी मारहाण झाली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी जुजबी कलमे लावून हे प्रकरण अत्यंत साधेपणाने घेतले व त्यामुळे अद्याप ही आरोपीवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने कालपासून कर्जत तालुक्यातील ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन करून कर्जत पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.  यामध्ये अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींवर योग्य कलमे लावून त्यांना अटक होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भावना व्यक्त केली. ग्रामसेवक हे जनतेच्या हिताचे गावाच्या विकासाचे व लोकप्रतिनिधी यांच्या सोईचे काम करत असतात; मात्र या कामकाजात अडचण आल्यास मात्र त्याच्या मागे कोणीही उभे राहत नाहीत; अशी संतप्त भावना ग्रामसेवकांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलन प्रसंगी अनेकानी व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना अनेकांनी, आपल्यातील कोणत्याही व्यक्तीवर कोणताही प्रसंग आला तर आपण एक झालं पाहिजे,  ग्रामसेवक कवडे यांना जबर मारहाण झालेली असताना योग्य पद्धतीचे कलमे लावण्यात आली नाहीत, आपण गावासाठी जीव तोडुन काम करतो मात्र ज्या गावासाठी, आपण काम करतो, गटा तटाला राजकारणाला तोंड देत काम करत असतो मात्र त्यातील एक ही व्यक्ती आपल्या मदतीला येत नाही, मग आपण काम कसे करायचे, म्हणून आपणच एकमेकाला मदत केली पाहिजे,  आपणच जर एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो तर आपल्याला कोणीही वाली राहणार नाही, ज्याच्यासाठी आपण कधी कधी नियम मोडून काम करतो ते पदाधिकारी कुठे आहेत, असा अत्यंत महत्वाचा मुद्दा यावेळी मांडला.  आपला संघर्ष थांबला नाही पाहिजे, पोलीस हे पण राज्यशासनाचे कर्मचारी आहेत आपणही राज्यशासनाचे कर्मचारी आहोत मग आपल्या बंधूला मारहाण झालेली असताना यांचे डोके भडकत का नाही, आज काल आपल्यावर अन्याय होऊन ही आपण गप्प बसतो जाऊ द्या तक्रार देऊन काय होणार आहे असे म्हणतो, म्हणून काळ सोकावतो आहे, कवडे याना झालेल्या मारहाणीनंतर गुन्हे कोणते लावले हे अत्यंत महत्वाचे असताना त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे व जो पर्यंत पोलीस अपेक्षित कलमे लावत नाहीत तो पर्यंत माघार घेता कामा नये, आगामी काळात ज्या ज्यावेळी आपल्या वर अन्याय होईल त्या प्रत्येक वेळी गुन्हा हा दाखल केलाच पाहिजे, असे मनोगते ग्रामसेवकांनी व्यक्त केली.

तर गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी बोलताना 75 व्या अमृत महोत्सवाच्या वर्षी आपण एका सिस्टीम ने काम करत असताना अशा पद्धतीने आपल्याला तोंड द्यावे लागत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. ग्राम विकास विभागात आपण सर्वानाच सहकार्य करतो पण त्याची जाणीव त्या त्या व्यक्तीला प्रशासनातील इतर विभागाना होत नाही, कर वसुली हा सिस्टीमचा भाग आहे व त्यात काही चुकत असेल तर त्याविरुद्ध दाद मागणे हा अधिकार आहे पण त्या ऐवजी मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे असून आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढी मदत मी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही केली असल्याचे म्हटले. यावेळी धर्मराज गायकवाड, कैलास तरटे, चंद्रकांत तापकीर, विजय बनाते, अनिल जगताप, अभियंता दिलीप कानगुडे, अनिल मते, विस्तार अधिकारी राज अटकोरे, विस्तार अधिकारी परमेश्वर सुद्रीक, यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

आंदोलन प्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी रुपचंद जगताप, विस्तार अधिकारी मुकुंद पाटील, अविनाश तनपुरे सह तालुक्यातील सर्व संघटनांचे ग्रामसेवक व ग्रामसेविका उपस्थित होत्या. यानंतर सर्वानी शांततेत मोर्चाने जाऊन उप विभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले व या प्रकरणात 307 सह विविध अजामीनपात्र गुन्हे दाखल करू गुन्हेगारांना अटक करावी यासह मिरजगाव पोलीस स्टेशन मधील तपासी अधिकारी बदलण्याची मागणी केली. उपविभागिय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!