Pune

कलागुणांना वाव देण्यासाठी ‘इंडियाज रायझिंग टॅलेंट’ राष्ट्रीय स्पर्धेचे अभिनेत्री तेजस्विनी पंडित, प्राजक्ता गायकवाड यांच्याहस्ते उदघाटन

पुणे : “देश सांभाळणे हे केवळ सैनिक, पोलीस किंवा राजकारण्यांचे काम नाही. देशातील प्रत्येक युवकाने यासाठी पुढाकार घेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आवाज उठविणे आवश्यक आहे. युवापिढीतील याच सकारात्मक ऊर्जेला आणि देशभक्तीला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न ‘इंडियाज रायझिंग टॅलेंट’ या राष्ट्रीय स्पर्धेद्वारे केला जात आहे. देश उभारणीसाठी युवकांचा सहभाग यातून मिळणार आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व अखिल भारतीय युवक काँग्रेस राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु केले.

तरुणांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे ‘इंडियाज रायझिंग टॅलेंट’ राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री तेजस्विनी पंडित व प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील हॉटेल प्राईडमध्ये झालेल्या सोहळ्यात कृष्णा अल्लावरु बोलत होते. प्रसंगी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही., महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, हास्ययोग प्रशिक्षक मकरंद टिल्लू, मिमिक्री कलाकार योगेश सुपेकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मितेंद्र सिंग यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सचिव डॉ. वैष्णवी किराड यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी प्रतिमा मुदगल, सहप्रभारी वंदना बेन, राष्ट्रीय सचिव प्रदीप सिंधव, उपाध्यक्ष शरण पाटील, तन्वीर विद्रोही, सोनल लक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस विजयसिंह चौधरी, प्रवीणकुमार बिरादार,अक्षय जैन प्रथमेश आबनावे, प्रदेश सचिव उमेश पवार, पुणे शहर युवक काँग्रेसचे राहुल सिरसाठ, उपाध्यक्ष सौरभ अमराळे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

इंडियाज रायझिंग टॅलेंट हा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम असून, देशातील चालू घडामोडींवर आपल्या कलेच्या माध्यमातून तरुणांना व्यक्त होण्यासाठी हे अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गायन-रॅप-कविता, पथनाट्य, स्टॅन्डअप कॉमेडी किंवा मिमिक्री आणि इन्स्टा रिल्स किंवा युट्युब शॉर्ट्स या चार प्रकारांत ही स्पर्धा होणार आहे. एक मिनिटाचा व्हिडीओ मागवण्यात येणार असून, त्यात जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर फिनाले होणार आहेत. ग्रँड फिनाले राष्ट्रीय पातळीवर होणार असून, एकूण नऊ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

कृष्णा अल्लावरू म्हणाले, “कार्यक्रमाची संकल्पना फार कलात्मक आहे. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रभक्ती असे विविध शब्द आपण वापरतो; पण ते वाढीस लागावे किंवा त्याचा देशाला उपयोग व्हावा यासाठी एवढा कलात्मक विचार पहिल्यांदाच होत आहे. कलेत, प्रतिभेत आणि आजच्या तरुणांमध्ये खूप ताकद आहे. कला, प्रतिभा आणि ताकद यांचा मेळ साधणारा हा कार्यक्रम आहे.”

श्रीनिवास बी. व्ही. म्हणाले, “तरुणांना आपल्या कलेद्वारे आवाज उठविण्यासाठी हा मंच दिला आहे. अनेकांना बोलायचे आहे, त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. पण आजवर त्यांना सुरक्षित आणि हक्काचा असा मंच नव्हता. तो मंच आम्ही देत आहोत. अनेक प्रश्न आहेत ज्यांच्याविषयी तरुणांना बोलायचे आहे. ते सर्व प्रश्न न घाबरता ते येथे मांडू शकतात.”

तेजस्वीनी पंडित म्हणाली, “खूप कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. अशा कलाकारांना, सामान्य लोकांना देशातील समस्या वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. समाजाला भावणाऱ्या समस्या मांडल्या जात असल्याने देशाच्या प्रगतीत याचा परिणाम दिसेल. देशात काय बदल घडावे, काय सुधारणा व्हाव्या असे त्यांना वाटते ते त्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी पद्धतीने मांडावे.”

प्राजक्ता गायकवाड म्हणाली, “प्रत्येकात प्रतिभा असतेच; फक्त त्याला योग्य व्यासपीठाची आवश्यकता असते. ‘इंडियाज रायझिंग टॅलेंट’मुळे ते व्यासपीठ मिळणार आहे. असे मोठे व्यासपीठ मिळते तेंव्हा तरुणांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द निर्माण होते. आपल्याला बरेच येत असले, तरी नेमक्या कोणत्या दिशेने जावे हे कळत नसते. तेव्हा असे व्यासपीठ ती दिशा दाखवते.”

मकरंद टिल्लू म्हणाले, “समस्यांकडे वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे. ती नजर आपल्याला कलेतून मिळते व मांडताही येते. जगाकडे हसत हसत बघण्यास आपण शिकलो की प्रश्न आपोआप सुटू लागतात.” योगेश सुपेकर यांनी आपल्या मिमिक्रीतुन उपस्थितांना खिळवून ठेवले. मिमिक्री म्हणजे परकाया प्रवेश असतो. आपल्याकडे गावांमध्ये, गल्ल्यांमध्ये सगळीकडेच खूप प्रतिभावंत तरुण आहेत. त्यांच्यासाठी हे व्यासपीठ संधी असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!