Chikhali

अंत्री खेडेकर शाळेतील मुला-मुलींना माकडांचा धोका; पत्रे खराब केली!

– चिंचेच्या झाडावर माकडांचा हैदोस, लहानग्या विद्यार्थ्यांना त्रास
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील जिल्हा परिषदेच्या मुले व मुलींच्या शाळेला माकड या वन्यप्राण्यापासून धोका निर्माण झाला असून, ही माकडे विद्यार्थी, विद्यार्थिनींवर हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, त्यांनी शाळेची पत्रे खराब केली असून, भरपावसाळ्यात ही पत्रे गळत आहेत. तेव्हा, शाळेवर नवीन स्लॅब टाकण्यात यावा, अशी मागणी शाळा समितीचे अध्यक्ष एकनाथ माळेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर ई-मेलच सीईओंना पाठवला आहे.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळा मुले व मुली यांचे प्रत्येकी चार वर्ग आहेत. शाळा एक ते चौथीपर्यंत असल्यामुळे शाळेतील मुले लहान आहेत. या शाळे भोवती मोठी चिंचेची झाडे आहेत. त्यामुळे वन्य प्राणी माकड दररोज या झाडावर येऊन बसतात व लहान मुलांच्या मागे लागतात. ते कधीही मुला-मुलींवर हल्ला ही करू शकतात. त्यामुळे शाळेतील मुला-मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शाळेभोवती असलेल्या चिंचेच्या झाडामुळे शाळेवरील पत्रे खराब झाली आहेत. त्यामुळे भरपावसात शाळा गळते. शाळेवरील पत्रे बदलून त्याऐवजी स्लॅब टाकण्यात यावा, अशी मागणी शाळा समितीचे अध्यक्ष एकनाथ रामराव माळेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. तसेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्तासाठी कारवाई करावी, अन्यथा अंत्री खेडेकर जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येईल. शाळेजवळील चिंचेचे झाड तोडून शाळेतील मुलांच्या जीवितास जो धोका निर्माण झाला आहे, तो कमी करून वनविभागाने वन्यप्राणी माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही माळेकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!