– गिरीश महाजन, राज्यपालही दिल्लीत पोहोचले
– ३ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार : आ. सत्तार
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – महिना होत आला तरी राज्यात मंत्रिमंडळ नसल्याने, जोरदार टीकेचे धनी होत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपश्रेष्ठींनी दिलासा देण्याचे ठरवले आहे. त्यांचे समर्थक आमदार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले. तसेच, भाजपनेते गिरीश महाजन हेदेखील दिल्लीला गेले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेही दिल्लीत आहेत. महाजन व सत्तार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत ३ ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती आ. सत्तार यांनी दिली आहे.
अमित शाह यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला निघाले होते. परंतु, त्यांच्या दिल्लीवारीवरून विरोधक टीका करत असल्याने, त्यांनी त्यांच्याऐवजी ज्येष्ठ आमदार अब्दुल सत्तार यांना तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे निकटवर्तीय भाजप नेते गिरीश महाजन यांना दिल्लीला पाठवले आहे. या दोघांनीही अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणाला किती जिल्हे मिळणार आहेत, किती खाती मिळणार आहेत, कोणाला किती मंत्रीपद मिळणार आहे, याच्या वाटाघाटी कदाचीत झालेल्या असतील, पण अंतिम निर्णय झालेला नाही, या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच, तीन ऑगस्टच्याआत शपथविधी होईल, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी देत, आम्ही कोणतीही अट ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेलो नाही, मंत्रिपद देणे किंवा न देणे, हा त्यांचा निर्णय असून तो जे निर्णय घेतील तो योग्य असेल, असेही सत्तार म्हणाले.
आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करणार आहे, मला राजीनामा देण्याची परवानगी द्या, आमच्या पन्नास आमदारांपैकी पहिला राजीनामा मी देणार आहे, असे सांगून आ. सत्तार यांनी, ३१ तारखेला आपल्या मतदारसंघात महामेळावा आहे, यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे, यावेळी आपण राजीनामा देऊ, असेही आ. सत्तार यांनी सांगितले. आमदार सत्तारांचा राजीनामा हा भाजपश्रेष्ठींवर दबाव तंत्राचा भाग असावा, असा संशयही राजकीय धुरीण व्यक्त करत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी घेतल्या शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या भेटी
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आज ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. हे तीनही नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत सेनेचे प्रमुख नेते आहेत. दरम्यान, या भेटींचा राजकीय अर्थ घेवू नका, असं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेतली, असं एकनाथ शिंदे सांगत आहेत. शिंदे यांनी आठ दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेच्या दोन दिग्गजांची भेट घेतली. शिंदे हे आज दादरच्या कोहिनूर येथे गेले आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्याआधी आज सकाळी त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची भेट घेतली होती. त्यामुळे जुन्या-जाणत्यांसाठी फिल्डिंग लावली जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.