– रोही (नीलगाय)च्या उच्छादामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी हतबल
चिखली (एकनाथ माळेकर) – गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे आधीच शेतकरी परेशान आहेत. त्यातच हातातोंडाशी आलेला सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकांचा घास रोही (नीलगाय) हिसकावून नेत आहेत. या शेतीपिकांची अतोनात नासाडी या वन्यप्राण्यांनी चालवली असून, लोणार, मेहकर, चिखली, सिंदखेडराजासह बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. रोह्यांनी केलेल्या शेतीपिकाच्या नासाडीची तातडीने भरपाई द्यावी व या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा वनविभागाच्या कार्यालयात शेतकरी घुसतील, असा दणदणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोणार तालुकाध्यक्ष अनिल मोरे यांच्यासह शेतकरी ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांचे खूप हालअपेष्टा होत आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. दोन दिवसा अगोदरच पावसाने उघडिप दिली आहे. पण त्या पाठोपाठ रोहीच्या (नीलगाय) सुळसुळाटामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतात सध्या सोयाबीन, उडीद, मूंग, कपाशी ही पिके वरती तोंड काढून डोलत आहेत. पण परिसरातील शेतात रोही घुसून उभ्या पिकाची नासाडी करत आहेत. रोही भरदिवसा व रात्रीच्या वेळी शेतात घुसून उभी पिके खाऊन व पिकाचे नुकसान करीत आहे. दरवर्षी शेतकरी या संकटाबाबत वनविभागाच्या कार्यालयाकडे धाव घेऊन आपल्या समस्या मांडत असतात. पण संबंधित प्रशासनाकडून यावर कुठल्याही प्रकारचे कारवाई केली जात नाही . परंतु, यावर्षी रोह्यांचा सुळसुळाट जास्त प्रमाणात वाढला असून, त्यामुळे शेतकरीवर्ग आता रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर आहे. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर रोह्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी. अन्यथा शेतकर्यांना घेऊन कार्यात घुसू आणि ठिय्या आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे व गावातील शेतकरी गजानन मोरे, रामेश्वर मोरे, संतोष मापारी मधुकर मोरे, दत्ता चौधरी, केशव मोरे, कृष्णा मापारी, विकास मोरे, सतीश भोसले, ज्ञानेश्वर हंभीले यांच्यासह अनेक शेतकर्यांनी दिला आहे.
Leave a Reply