– मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार!
चिखली (महेंद्र हिवाळे) – पीकविमा, नुकसान भरपाई, सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्तीमहामार्ग रद्द करण्यात यावा, विहिंरीसाठीचे अनुदान तातडीने मंजूर करण्यात यावे, यासह इतर शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांचे आज नागपंचमीच्या सणाच्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी लेकरं उपाशीपोटी असल्याचे पाहून गावातील माय-माऊल्यांनी आज चिखली तहसीलसमोरील आंदोलनस्थळ गाठून दोन घास खाण्याचा मायेचा आग्रह सरनाईक व राजपूर यांना धरला. परंतु, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत अन्नाचा घास खाणार नाही, असे सांगून या दोघांनीही मायमाऊलींनी आणलेले गोडाधोडाचे जेवण नाकारले. याप्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व प्रशासनाच्या निगरगट्ट कारभाराचा पर्दाफास करण्यासाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी पाच दिवसांपासून अन्न व पाण्याचा त्याग करून आपले अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी हे दोन तरूण नेते उपाशीपोटी असल्याने गावखेड्यात आज नागपंचमीच्या सणाचे गोडधोडही कुणाला खावेसे वाटले नाही. त्यामुळे या दोघांच्या गावांतील मायमाऊलींसह शेतकरी माताभगिनींनी घरी सणानिमित्त केलेले गोडधोड घेऊन चिखली येथील आंदोलनस्थळ गाठले व या दोघांनाही दोन घास खाण्याची विनवणी केली. सणासुदीला तुम्हीच उपाशी असल्याने आम्हाला सण गोड लागत नाही, अशी विनवणी या मायमाऊल्या करत होत्या. परंतु, शेतकर्यांच्या भल्यासाठी जीव गेला तरी मागण्या मान्य होईपर्यंत अन्न खाणार नाही, अशी भूमिका सरनाईक व राजपूत यांनी घेतली. त्यामुळे आलेल्या मायमाऊल्यांचा भ्रमनिराश झाला. अनेक गावांत शेतकर्यांना आजचा सण गोड लागला नाही.
राज्य सरकारला उच्चस्तरीय बैठक घ्यायला लावून चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा घडवून आणली आहे. पीकविमा लवकरच जमा होणार असून, नुकसान भरपाई देण्यासदेखील राज्य सरकार तयार झाले आहे. शेगाव-सिंदखेडराजा भक्ती महामार्गदेखील रद्द करण्यास सरकार तयार असून, याबाबतची प्रशासकीय कार्यवाही थांबवली आहे. तथापि, भक्ती महामार्ग रद्द करावा, अशी मागणी काही शेतकरी करत असताना, हा महामार्ग व्हावा, अशीही मागणी काही शेतकरी करत आहेत. त्यामुळे राज्य सरकार द्विधा मनस्थितीत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या उच्चस्तरीय बैठकीत शेतकर्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्या, असे आदेश प्रशासकीय अधिकार्यांना दिलेले आहेत. तसेच, इतर वीज वितरण, विहिरींचे अनुदान या मागण्यांदेखील स्थानिक प्रशासनाने मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, असा सूर चिखली तालुक्यातून उमटत आहेत. या आंदोलनामागे एका स्थानिक काँग्रेस नेत्याचा हात असल्याचा सूरही उमटत होता. पण, विनायक सरनाईक यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.
————-
शेतकर्यांच्या भावना समजून घेऊन भक्तीमहामार्ग रद्दची कार्यवाही करा!