SINDKHEDRAJAVidharbha

सिंदखेडराजात महसूल कर्मचार्‍याचे लेखणीबंद आंदोलन!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनांच्यावतीने सिंदखेडराजा येथे लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य न केल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारादेखील महसूल कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

सविस्तर असे, की काल, दि. १२ जुलैरोजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजय पिपरकर व बुलढाणा जिल्हाध्यक्ष किशोर हटकर या सर्वांच्या नेतृत्वाखाली सबंध बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाविरुद्ध प्रशासनातील महसूल कर्मचारी संघटना यांचे आंदोलनातील टप्पा क्रमांक तीनच्या अनुषंगाने काल लेखणीबंद आंदोलन करण्यात आले असून, दिनांक १५ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या मागण्या अशा आहेत, १९८२ च्या जुन्या पेन्शनच्या निकषानुसार २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन मिळावी. राज्य शासनाने सुधारित आकृतीबंध तयार करून तो मंजुरात करावा. अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती करावी, महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे २४०० करावा, व प्रशासनात व महसूल कर्मचारी यांची रिक्त पदे तात्काळ भरावी. जेणेकरून शासनाने दिलेल्या जबाबदार्‍या ह्या विहित वेळेत व विहित कालावधीत पूर्ण करण्यात येतील. तसेच महसूल प्रशासनातील अविभाज्य भाग चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांची पदेसुद्धा जे रिक्त आहेत ते तात्काळ भरण्यात यावे. कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात येऊन त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा. सदर आंदोलन हे उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंदखेडराजा या तालुक्याच्यावतीने तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे संजय आटोळे कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्षतेखाली पार पडले. तसेच यावेळेस महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव रामेश्वर खरात, कोतवाल कर्मचारी आर. जी. खरात, आर. बी. खरात, पी. आर. सुरुशे, एस. एस. पवार, संतोष इंगोले आदी उपस्थित होते. तसेच इतर कर्मचारी व महिला सर्व मंडळी शंभर टक्के उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!