Breaking newsChikhaliHead linesVidharbha

चिखली तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांचे पीकविम्याचे पैसे घशात घालण्याचा विमा कंपनीचा डाव!

– अटी न लादता हरभरा पीकविमा शेतकर्‍यांचा खात्यावर जमा करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

चिखली (महेंद्र हिवाळे) – बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एआयसी या पीकविमा कंपनीच्या माध्यमातून चिखली तालुक्यातील ४६ हजार २४५ शेतकर्‍यांनी हरभरा पिकाचा विमा काढला होता. यापैकी २२ हजार ९१५ शेतकर्‍यांनी अतिवृष्टी झाल्यानंतर ऑनलाइन तक्रारी सादर केल्या होत्या. या पैकी १४ हजार १२९ शेतकर्‍यांना पीकविम्यासाठी पात्र ठरवण्यात आले. मात्र ऑनलाइन तक्रारी केलेल्या असताना विविध करणे दाखवत, या पीकविमा कंपनीने तब्बल ८ हजार ७८६ शेतकर्‍यांना अपात्र ठरवून त्यांच्या पीकविम्याचा पैसा घशात घालण्याचा डाव रचला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे संतप्त झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्‍यांनी या पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना धारेवर धरत, तक्रार केलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हरभरा पिकाच्या नुकसानीची विमा रक्कम त्वरित अदा करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. तसेच, हा पीकविमा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.
पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीला धारेवर धरताना शेतकरी नेते विनायक सरनाईक व शेतकरी.

शेतकर्‍यांच्या शेतीपिकाचे अस्मानी संकटाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राज्य सरकारने शेतकर्‍यांना फक्त एक रुपयात पीकविमा काढण्याची योजना लागू केली होती. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एआयसी पीक कंपनीच्या माध्यमातून चिखली तालुक्यात ४६ हजार २४५ शेतकर्‍यांनी हरभरा पिकाचा विमा काढला होता. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान, २२ हजार ९१५ शेतकर्‍यांनी ऑनलाइन तक्रारी सादर केल्या होत्या. पीकविमा कंपनीकडून रँडंम पद्धतीने नुकसानीचे पंचनामेदेखील करण्यात आले. त्यावेळी अनेक शेतकर्‍यांची नावे ऑनलाइन प्रणालीमध्ये नसल्याची बाब उघडदेखील झाली होती. त्या वेळी टाकरखेड मु. येथील शेतकर्‍यांनी कृषीविभागाकडे तक्रारसुद्धा दाखल केली होती. परंतु, तरीदेखील या गंभीर प्रकरणाची दखल घेतली गेली नाही.

पीकविमा कंपनी शेतकर्‍यांचे पैसे हडप करत असल्याचे पाहाता, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी दिनांक ५ जूनरोजी शेतकर्‍यांना सोबत घेऊन चिखली तालुका कृषी कार्यालय गाठले. तेथे पीकविमा प्रतिनिधींना बोलावून पीकविमा अपात्र प्रकरणी त्यांना चांगलेच धारेवर धरले. ऑनलाइन तक्रारी केलेल्या सर्व शेतकर्‍यांना कुठलेही करणे दाखवत पीकविम्यापासून वंचित न ठेवता पीकविमा रक्कम तात्काळ खात्यावर जमा करण्यात यावी, अन्यथा शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा यावेळी कृषिविभाग व पीकविमा कंपनीला विनायक सरनाईक व शेतकर्‍यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!