मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, राजकीय घडामोडींना वेग!
आपणच खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगासमोर सिद्ध करण्याची शिंदे गटाची रणनीती
– मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली भेट; या खासदारांना केंद्र व राज्याकडून वाय-दर्जाची सुरक्षा व्यवस्था
– पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मुख्यमंत्री शिंदे करणार भेटीगाठी
– ओबीसी आरक्ष़णाच्या सुनावणीसाठी दिल्लीत; शिंदे यांची ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी चर्चा
– शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या संबंधीच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या (बुधवारी) सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार असल्याने, शिंदे यांनी आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी व आपल्या समर्थक खासदारांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. काल मध्यरात्री शिंदे हे दिल्लीत पोहोचले. ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसंदर्भात आपण दिल्लीत आलो आहोत, असे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत, त्यांच्याशी चर्चा केली. तसेच, लाेकसभेच्या अध्यक्षांना पत्र देत, स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची विनंती केली आहे.
राजधानीतील महाराष्ट्र सदन येथे उतरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता, त्यांनी आपण ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो आहोत. कारण, महाराष्ट्र सरकार ओबीसींना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या अपात्रतेसंबंधीच्या याचिकेबाबत बोलताना त्यांनी आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगत, लोकशाहीत बहुमताला महत्व असते. आम्ही सर्व नियमांचे पालन केले आहे, असे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची स्वतंत्र बैठक घेतली व त्यांना पुढील रणनीतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांचे बैठकीच्या सुरुवातीला स्वागत केले. शिंदे यांच्याकडून आज दिवसभर बैठकांचा सिलसिला सुरु होता.
शिवसेनेच्या १२ खासदारांचा स्वतंत्र गट; लोकसभा अध्यक्षांची घेतली भेट, पत्र दिले!
दरम्यान, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यासह १२ खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचे पत्र देण्यासाठी ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत खासदारांची संख्या आणि त्या संदर्भातले नियम यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाच्या पत्रात बदल सुचवले आहेत. शिंदे गटाने आपले पत्र मुख्य प्रतोदांच्या नावाने द्यावेत, अशी सूचना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे शिंदे गटासोबत नाहीत. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर, शिवसेनेतील प्रतोद भावना गवळी या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या नावाने पत्र आणि बारा खासदारांच्या सह्या अशी रचना करून पत्र नव्याने देण्याची सूचना लोकसभा सचिवालयाने केली हाेती. त्यानुसार तसे पत्र देण्यात आले आहे.
दरम्यान, या १२ खासदारांना केंद्र सरकारने तातडीने वाय-दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. राज्य व केंद्राकडून ही सुरक्षा त्यांना कायम राहणार आहे. खासदार राहुल शेवाळे हे या गटाचे पक्षप्रतोद असून, ते लोकसभा अध्यक्षांना तसे पत्र देत आहेत. या १२ खासदारांत प्रतापराव जाधव, भावना गवळी, ध्यैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावीत, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने यांचा समावेश आहे.