चिखली (महेंद्र हिवाळे) – वाघापूर ते रायपूर या रस्त्याच्या कामासाठी मौजे वाघापूर येथील सरकारी गट नंबर ५४ मधील मुरूमाचा अवैधरित्या वापर होत असून, सरकारी गौणखनिजाचे अवैध उत्खनन होत असताना, तलाठी व महसूल अधिकारी मात्र डोळ्यावर गेंड्याची कातडी पांघरून बसले आहे. याबाबत महेंद्र तुकाराम हिवाळे यांनी चिखली तहसीलमध्ये रितसर तक्रारदेखील दाखल केलेली आहे. तरीदेखील अधिकारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकारी यांनी तातडीने या गौण खनिज चोरीची दखल घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.
मौजे वाघापूर शिवारातील शासकीय जमिनीवरील मुरूम सर्रासपणे उकरला जात असून, तो वाघापूर ते रायपूर या रस्त्याच्या कामासाठी वापरला जात आहे. या मुरूम चोरीबाबत ग्रामपंचायत कार्यालय अंत्री कोळी येथे विचारणा केली असता, सदर मुरूम काढण्याबाबत ग्रामपंचायतीने कुणालाही परवानगी दिली नाही, असे सांगण्यात आले. तसेच, महसूल अधिकारी असलेल्या तहसील कार्यालय चिखली येथे विचारणा केली असता, त्यांनीही कानावर हात ठेवले, व अशी कोणतीही परवानगी दिली गेली नाही, हे स्पष्ट केले. म्हणजे, ठेकेदाराने तहसीलदारांची परवानगी न घेताच खुलेआम मुरूम चोरी सुरू केलेली आहे. तसेच, शासनाची रॉयल्टी न भरता शासनाला लाखो रूपयांचा चुना दिवसाढवळ्या लावला जात आहे. याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली गेली असता, अद्याप या ठेकेदारावर काहीच कारवाई झालेली नाही. तसेच, या मुरूम जप्त करून तो शासनाकडे जमा करण्याबाबतही टाळाटाळ सुरू होती. याबाबत महेंद्र हिवाळे यांनी मंडळ अधिकारी झिणे यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित तलाठ्यांना विचारा, असे मोघम उत्तर दिले. तलाठ्याला विचारले असता, वेळ भेटेल तेव्हा पाहू, असे सांगून कर्तव्यात कसूर करून कारवाईस टाळाटाळ चालवली आहे. तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल विभागातील काही अधिकार्यांमुळे संबंधित ठेकेदार शासनाला लाखो रूपयांचा चुना लावत असून, यात महसूलचे संबंधित अधिकारी त्याला पाठीशी घालत असल्याने या अधिकार्यांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झालेला आहे.
————-