– सिंदखेडराजा ते शेगाव भक्तीमार्गासाठी शेतजमिनींच्या अधिग्रहणाने शेतकरी धास्तावले!
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील कवठळ शिवारातून जात असलेल्या सिंदखेडराजा राजा ते शेगांव या नवीन महामार्गामध्ये शेतजमिनी अधिग्रहीत करण्याची अधिसूचना निघाल्याने कवठळ शिवारातील अनेक शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. आज (दि.5) या शेतकऱ्यांनी चिखलीचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या शेतजमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध केला असून, हे अधिग्रहण थांबविण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात शेतकऱ्यानी नमूद केले , की सदर भक्तीमार्गासाठी आमच्या जमिनी घेऊन आम्हाला भूमिहिन किंवा अल्पभूधारक करण्यात येऊ नये. या राज्य महामार्गामध्ये आमच्या कवठळ ता.चिखली, जि.बुलडाणा शिवारातीत जवळपास २५ ते ३० शेतकरी बाधित होत आहे. आधीच आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून शेतजमिनी गेल्यास भूमिहीन आमची कुटुंबे रस्त्यावर येणार आहे. भविष्यातील उदरनिर्वाचे साधन संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आम्ही भयग्रस्त झालो आहोत. सदर महामार्गासाठी आमच्या पिकाऊ जमिनी अधिग्रहीत करण्यास आम्हा सर्व शेतकऱ्यांचा तिव्र विरोध आहे. तरी शासन आणि प्रशासनाच्यावतीने आमच्या भावनांचा व उपजिवीकेचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन अभय द्यावे. आमच्या परिसरातून सिंदखेडराजा ते शेगांव जाणारे अनेक पर्यायी राज महामार्ग उपलब्ध आहे. त्यात प्रामुख्याने, देऊळगांवराजा – चिखली ते शेगांव, दुसरबीड साखरखेर्डा ते शेगांव, मेहकर येथील समृद्धी रिंग रोड जवळून जाणारा मेहकर-जानेफळ शेगांव हे मार्ग उपलब्ध आहे. कोणीही या महामार्गाची मागणी केलेली नाही. मुंबई किंवा दुरवरच्या लोकांना शेगांवला जाण्यासाठी रेल्वे व इतर ही मार्ग आहेत. त्यांचे पाच दहा मिनीट वाचवण्यासठी आमच्या काळ्या आईला हिसकाऊन घेऊन आमच्या पुढील पिढीच्या भविष्यावर गंडांतर आणू नये. तरी सदर भक्तीमहामार्गस स्थगित करुन आम्हाला अश्वस्त करावे. अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आंदोलनाचे तीव्र शस्त्र हाती घ्यावे लागेल, अशा इशाराही शेतकरीवर्गाने शासनाला दिला आहे.
या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलढाणा, तहसीलदार चिखली, भूसंपादन अधिकारी चिखली, खासदार बुलढाणा, आमदार चिखली, पालकमंत्री बुलढाणा जिल्हा यांनादेखील चिखली तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर कवठळ शिवारातील शेतकरी अमोल काकडे, ऋषिकेश वाघमारे, अमोल कऱ्हाडे, भिकाजी खेडेकर यांच्यासह वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.