खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी भूमिपुत्रांनी तोंडाला फासून घेतले काळे!
– रेल्वे लोक आंदोलन समितीच्या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू – आंदोलकांचा इशारा
चिखली (महेंद्र हिवाळे) – खामगाव – जालना रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करावा, चिखली येथे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही या मार्गासाठीचा राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा सरकारने रेल्वे बोर्डाकडे हस्तांतरित केला नाही, तो लवकर करावा, आदी मागण्यांसाठी रेल्वे लोकआंदोलन समितीच्यावतीने चिखली येथील तहसीलसमोर सत्याग्रह व साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शेतकरी नेते विनायक सरनाईक, संतोष पाटील भुतेकर, नितीन राजपूत यांच्यासह शेतकरी भूमिपुत्रांनी सहभागी होत, तोडाला काळे फासून घेत सरकारचा तीव्र निषेध केला. आठवडाभरात मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्ह्यात येणार्या मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा या आंदोलकांनी यावेळी दिला. या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती.
खामगाव – जालना रेल्वेमार्गाबाबत सरकार फक्त घोषणा करते, परंतु कार्यवाही करत नाही. हा मार्ग व्हावा, यासह इतर मागण्यांसाठी रेल्वे लोकआंदोलन समितीचे चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह, साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने त्वरित निधी मंजूर करावा, यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला २१ दिवस उलटले. परंतु आजपर्यंत राज्य सरकारला याबद्दल जाग आली नाही. मुख्यमंत्री यांनी चिखली येथील कार्यकर्ता मेळाव्यात ५० टक्के राज्य शासनाचा हिस्सा देऊ केला. परंतु दोन आठवडे उलटूनसुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही. तर गेल्या २१ दिवसांपासून आंदोलन सुरु असतांना याची दखल घेतली जात नसल्याने आज (दि.१ फेब्रुवारी) शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक सरनाईक, संतोष भूतेकर, नितीन राजपूत यांनी शेतकर्यांसह तोंडाला काळे फासून घेत अनोखे आंदोलन केले. यावेळी तहसील कार्यालयामधे प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे प्रशासन खरबडून जागे झाले नाही, या आंदोलनाची दखल घेऊन आठवडाभरात मागण्या मान्य न केल्यास, यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू, तसेच मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारासुद्धा याप्रसंगी या आंदोलकांनी दिला आहे. याबाबतच्या मागण्यांचे निवेदनही चिखली तहसीलदारांना देण्यात आले आहे.
————