– राज्यभरातील भाविकांची पू. शुकदास माऊलींच्या समाधीदर्शनासाठी मांदियाळी
– शिक्षणाची वारी या अनोख्या दिंडीची सांगता, अहवाल जिल्हाधिकार्यांना सोपविणार
हिवरा आश्रम, ता. मेहकर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – संपूर्ण जीवन युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या कर्मसिद्धांताप्रमाणे वेचणारे आणि जगभर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे निष्काम कर्मयोगी तथा मानवहितकारी संत पू. शुकदास महाराज यांच्या समाधीदर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातील भाविक-भक्तांनी एकच गर्दी केली होती. यानिमित्त विवेकानंद आश्रमाच्यावतीने भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मोठ्या प्रमाणात गरजुंनी लाभ घेतला.
विवेकानंद आश्रमात काल गुरूपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तीभावाने व उत्साहाने संपन्न झाला. गेल्या आठवडाभरापासून पडणारा मुसळधार पाऊस तसेच अनेक नदी-नाल्यांना आलेले पूर या सर्व परिस्थितीवर मात करून भाविकांनी पूज्यनीय संत शुकदास महाराजांच्या समाधी दर्शनासाठी आश्रमात गर्दी केली होती. गुरू हा जीवनाचा पाठीराखा असतो. त्याच्या कृपेसाठी व मार्गदर्शनासाठी प्रत्येकजण गुरूगृहाची वाट धरतो. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक व लक्षावधी दीन, दुःखीतांच्या जीवनाचे आधार बनून ज्यांनी दुबळ्यांची, वंचितांची सेवा केली व आश्रमासारख्या अलौकिक सेवा संस्थेची स्थापना केली. ते प. पू. महाराज अनेकांच्या श्रध्देचा व भाविकांच्या भक्तीभावाचे अधिष्ठान ठरले आहे. काल त्यांच्या समाधी पूजनासोबतच रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय ग्रामीण रूग्णालयात संपन्न झालेल्या या शिबीरात रूग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. गरजूंना औषधे वितरण व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या शिबीरामध्ये डॉ. अमित धांडे बालरोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक, डॉ. पूजा धांडे, डॉ. विनय अजगर, डॉ. राजेंद्र सवडतकर, डॉ. लुंबिनी इंगळे, डॉ. गौरव बंगाळे यांनी आपली सेवा दिली. विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी ,प्राध्यापक प्रा.अमोल शेळके, प्रा.जयप्रकाश सोळंके हेदेखील या उपक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला हरीहर तीर्थावर महाआरतीने झाली. आश्रम परिसराची स्वच्छता झाल्यानंतर सकाळी ९ वाजता समाधीस्थळी महाराजश्रींचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी असंख्य भाविक उपस्थित होते. विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाची वारी या विवेकानंद आश्रम ते पंढरपूर व पंढरपूर ते विवेकानंद आश्रम या दिंडीतील सहभागी तरूणांचे मनोगत, अनुभव इत्यादी कथनाने दिंडीची सांगता झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते हे होते. विवेकानंद आश्रम हे शिक्षणाचे मोठे केंद्र असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी व शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणारी संस्था म्हणून प्रसिध्द आहे. या दिंडीने अनेक शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांच्या समस्या, गावाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती व शिक्षणासंबंधीच्या उपाययोजना यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. हे करून आपला अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करणार असल्याचे यावेळी सांगितले. या टीम तरूणाईत अभिषेक आकोटकर, आकाश गणेश, प्रशांत निर्मला, सुरज मोहन, सुरज मोहन प्रीती शोभा हे सहभागी झालेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्ञानेश्वर गाडे यांनी केले. तसेच, दिवसभर राज्यभरातून भर पाण्यापावसात आलेल्या असंख्य भाविकांनी आपल्या परमलौकिक गुरुस अभिवादन करत, त्यांचे संजीवन समाधीतून आशीर्वाद प्राप्त केले.
—————
Leave a Reply