Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraVidharbhaWorld update

तुपकरांच्या अटकेआडून पोलिसांना कोण ‘ऑपरेट’ करतयं?

– आंदोलनाआधीच तुपकरांना अटक करणार्‍या पोलिसांना आत्मचिंतनाची गरज!
– जिल्हा न्यायालयाने दोनवेळा उपटले पोलिसांचे कान!

बुलढाणा/मुंबई (खास प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची घोषणा केली की, बुलढाणा पोलिस त्यांना कलम १४९ अन्वये नोटीस देते, त्यानंतर तुपकरांना भूमिगत व्हावे लागते, त्यांचा शोध घेऊन पोलिस त्यांना आंदोलनाआधीच अटक करून पोलिस ठाण्यात डांबते, त्यांच्यावर कलम १५१ अनुसार गुन्हाही दाखल करते. तुपकर आणि पोलिस यांचा पाठशिवणीचा हा खेळ वारंवार होत असून, अशा अटकेनंतर जिल्हा न्यायालय पोलिसांना फटकारत तुपकरांची सुटकादेखील करत आलेले आहे. वारंवार फटकार मिळूनही बुलढाणा पोलिस तुपकरांना अटक करून पोलिस दलाची प्रतिमा शेतकरीवर्गाच्या डोळ्यात मलीन करण्याचे काम का करत आहे? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पोलिसांना जिल्ह्यात कोण ‘ऑपरेट’ करत आहे का? याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, आजच्या घटनाक्रमांतून तुपकरांची प्रतिमा पुन्हा एकदा उजाळून निघाली असून, लोकसभेच्या निवडणुकीत तुपकरांचा फक्त लीड मोजणे बाकी राहिले आहे.

सोयाबीन, कापूस, पीकविमा, पिकांची नुकसान भरपाई हे शेतकरीहिताचे मुद्दे घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लढत आहेत. त्यासाठी त्यांनी वारंवार आक्रमक आंदोलने करून राज्य सरकारला शेतकर्‍यांच्या पदरात काही ना काही तरी टाकण्यासाठी बाध्यही केलेले आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून तुपकरांच्या आंदोलनांना नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देणारे राज्य सरकार त्यांच्यापासून सावध पवित्रा बाळगून आहे. तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली, आणि राज्य सरकारमधील एक घटक त्यांच्याविरोधात गेला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुपकरांचे चांगले मित्र आहेत. परंतु, त्यांनीही एका टप्प्याच्या पुढे तुपकरांना सकारात्मक प्रतिसाद देण्यास टाळाटाळ चालवली दिसते आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय समिकरणाचा तुपकरांच्या शेतकरीहिताच्या भूमिकेला मोठा फटका बसत आहे. सत्तेतील एक गट आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक सत्ताधारीवर्ग हा तुपकरांच्या विरोधात गेलेला आहे. रविकांत तुपकर हे जोपर्यंत निवडणुकांच्या राजकारणापासून दूर होते, तोपर्यंत ते सर्वांना चालत होते. परंतु, जिल्ह्यातील शेतकरी तुपकरांमध्ये त्यांचा भावी खासदार पाहू लागले तर मात्र राजकारणातील एक घटक रविकांत तुपकरांना पाण्यात पाहू लागला आहे. हाच घटक जिल्हा पोलिसांना ऑपरेट करतो आहे का? असा प्रश्न जिल्हावासीयांच्या मनात निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षभरात तुपकरांनी जी काही आंदोलने केलीत, ती कलम १५१चा गुन्हा दाखल करून मोडित काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, तसेच त्या आरोपांत त्यांना अटक करून जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्नही केला. परंतु, अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांच्यासह जिल्ह्यातील तज्ज्ञ वकिलांची फौज तुपकरांच्या पाठीमागे असल्याने न्यायालयाच्या माध्यमातून पोलिस व सत्ताधारी गटाचे मनसुबे उधळण्यात रविकांत तुपकरांना यश आले आहे.
आतादेखील कलम १५१च्या गुन्ह्यात तुपकरांना जामीन देऊन न्यायालयाने पोलिसांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. वास्तविक पाहाता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, किंवा काही अनुचित प्रकार घडविला जाण्याची शक्यता वाटत असेल, तर कोणत्याही व्यक्तीला पूर्वसूचना न देता अटक करण्याचा अधिकार कलम १५१ अन्वये पोलिसांना आहे. परंतु, चोवीस तासाच्याआत अटकेतील व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करणे बंधनकारक आहे. पोलिस हे तुपकरांविरोधात वारंवार हे कलम लावत असून, न्यायालय वारंवार तुपकरांची अटक बेकायदेशीर ठरवत आहे. त्यामुळे बुलढाणा पोलिस कलम १५१च्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होत असल्याने नियमानुसार, अशी कारवाई करणार्‍या पोलिस अधिकार्‍यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. शिवाय, पोलिसांनीही कुणाच्या दबावाखाली कारवाई करून पोलिस दलाची प्रतिमा जनमाणसात व खास करून शेतकरीवर्गात खराब करणे टाळले पाहिजेत.


दरम्यान, मिसाळवाडी (ता. चिखली) येथील जाहीर सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूसप्रश्नी मलकापूर रेल्वेस्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी व यानिमित्ताने कायदेशीर, व कायदा आणि सुव्यवस्थेचा पेच निर्माण करून तुपकरांना किमान १५ दिवस तरी कारागृहात डांबण्यासाठी एक यंत्रणा कामाला लागली असल्याची खात्रीशीर व गोपनीय माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला प्राप्त झाली होती. ही माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यापर्यंतदेखील पोहोचविण्यात आली होती. त्यामुळे तुपकर हेदेखील सावध झाले होते. तुपकरांनी गमिमीकाव्याने मलकापूर रेल्वेस्थानक गाठून आंदोलनाचे नेतृत्व करण्याची रणनीतीही आखली होती. परंतु, तुपकरांसोबत असलेल्या एका मोबाईलचे लोकेशन पोलिसांकडून ट्रेस झाले, त्यासाठी तुपकरांच्या निकटवर्तीयाकडूनच नकळतपणे माहिती लीक झाली होती. त्यामुळे ट्रेस झालेल्या लोकेशनच्या आधारे बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना हुडकून काढून त्यांची गाडी राजूर घाटात पाठलाग करून अडविली, व त्यांना अटक केली होती. तुपकरांच्या पश्च्यात अ‍ॅड. शर्वरीताईंनी जोरदार किल्ला लढविला. शेतकर्‍यांचा वाघ पोलिसांच्या पिंजर्‍यात असला तरी ही वाघीणही तितक्याच ताकदीने चळवळ पुढे नेऊ शकते, हे त्यांनी केवळ पोलिसांनाच नाही तर तुपकरांच्या राजकीय विरोधकांनाही दाखवून दिले आहे. तुपकरांवर जेव्हा असे कायद्याच्या कचाट्यात पकडणारे हल्ले होतात, तेव्हा त्यांचे नेतृत्व अधिक ताकदीने चकाकून निघत असते. आतादेखील आजच्या कठीण संघर्षानंतर शेतकरी, कष्टकरीवर्गासह सर्वसामान्य जिल्हावासीय तुपकरांच्या पाठीशी जोरदारपणे एकवटले असून, लोकसभा निवडणुकीत तुपकरांच्या विजयाचा फक्त लीड मोजणे बाकी उरले आहे.
—-

सरकार थोबाडावर आपटले! रविकांत तुपकरांची न्यायालयाकडून सुटका!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!