शेतकर्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा १९ तारखेला मलकापुरातून दिल्ली, गुजरातकडे जाणार्या रेल्वे रोखणार!
– सरकार नुसत्याच घोषणा करते, पीक नुकसान भरपाई देत नाही, सोयाबीन-कापूसप्रश्नी आता निर्णायक लढाईचा इशारा
– रविकांत तुपकरांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मिसाळवाडीकरांनी दिला तब्बल एक लाख रूपयांचा लोकनिधी
– शेती करता करता कर्जबाजारी होऊन मरायचे नसेल तर रविकांत तुपकरांना लोकसभेत पाठवा – पुरूषोत्तम सांगळे
– मिसाळवाडीसारख्या खेड्यात रविकांत तुपकरांचे अभूतपूर्व स्वागत, तुडूंब गर्दीने खचाखच भरलेली विराट जाहीर सभा
मिसाळवाडी (ता. चिखली, जि. बुलढाणा) – येलो मोझॅक, बोंडअळी, दुष्काळाची मदत व सोयाबीन-कापसाला दरवाढ या मागण्यांसाठी गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. सरकार मात्र शेतकर्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही. सत्तेच्या धुंदीत मश्गुल असणारे मुख्यमंत्री महोदय राज्यभर पक्षाचे दौरे करत आहेत, पण सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी दिल्ली दरबारी जायला त्यांना वेळ नाही. नुसतीच नुकसानभरपाईची घोषणा केली. पण एक रुपया नुकसान भरपाई शेतकर्यांच्या जमा झाली नाही. त्यामुळे आता शेतकर्यांचा संयम सुटत चाललेला आहे. तेव्हा सरकारने १८ जानेवारीपर्यंत आमच्या मागण्यांवर अंमलबजावणी करावी, अन्यथा १९ जानेवारीला सकाळी ६ वाजल्यापासून मलकापूर रेल्वे स्टेशनवरून दिल्ली, गुजरात आणि मुंबईच्या दिशेने जाणार्या सर्व रेल्वेगाड्या अडवल्या जातील, असा खणखणीत इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यातील आदर्शगाव असलेले मिसाळवाडी (ता. चिखली) येथून दिला. मिसाळवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने तुपकर यांचा जाहीर सत्कार व परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती. एका छोट्याशा खेड्यात या निमित्ताने विराट गर्दीची शनिवारी रात्री सभा पार पडली. या सभेतून तुपकर बोलत होते. तर, शेतकर्यांच्या प्रश्नांवर लढणारा हा लढवय्या नेता, आता लोकसभेत पाठविणे ही बुलढाणा जिल्ह्याची गरज आहे, ही संधी हुकली तर शेतकर्यांच्यापोटी जन्माला आलेले आपण शेती करता करता कर्जबाजारी होऊन एक एक करून फासावर लटकू, असा इशारा राज्यातील वरिष्ठ पत्रकार तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक व मिसाळवाडीचे भूमिपुत्र पुरूषोत्तम सांगळे यांनी दिला. याप्रसंगी मिसाळवाडी ग्रामस्थांच्यावतीने तुपकरांना तब्बल एक लाख रूपयांचा निधी त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या खर्चापोटी देत, शेतकरी चळवळीला अर्थसहाय्य देऊन आपला खारीचा वाटा उचलला. प्रारंभी गावातील तरूणाईने रविकांत तुपकरांचे गावात आगमनप्रसंगी जेसीबीतून पुष्पवृष्टी करत, तसेच त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोषात स्वागत केले.
याप्रसंगी शिक्षणमहर्षि तथा या भागातील ज्येष्ठ नेते शेणफडराव घुबे, प्रकाश आबा पाटील, इसरूळचे सरपंच सतीश पाटील भुतेकर, कोनडचे सरपंच अजाबराव जावळे, ज्येष्ठ शेतकरी नेते भानुदास पाटील घुबे, चिखली बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण मिसाळ, शेतकरी नेते विनायक सरनाईक, युवा शेतकरी नेते राजू पाटील भुतेकर, पिंपळवाडीचे युवा नेते राहुल मिसाळ, शेनफड पाटील सुरूशे, खामगावातील आक्रमक आंदोलनामुळे चर्चेत आलेले शेतकरी रवी महानकार, दीपक घुबे, पत्रकार भिकनराव भुतेकर, नितीन राजपूत, भगवान मोरे, भारत वाघमारे, बबनराव चेके, रामेश्वर अंभोरे, दत्तात्रय जेऊघाले, गजानन घुबे, भगवान परिहार, राजूभाऊ मिसाळ, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ, माजी सरपंच देवीदास मिसाळ, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा प्रभावी वक्ते शिवश्री प्रवीण मिसाळ, पोलिस पाटील रवी पाटील मिसाळ, सुनील मिसाळ, गजानन मिसाळ, किशोर सुरडकर, संतोष भगत, अनिल काकडे, श्याम भगत, ज्ञानेश्वर बुरकूल यांच्यासह पिंपळवाडी, कोनड, अमोना, शेळगाव आटोळ, इसरूळ, मंगरूळ, अंचरवाडी, भरोसा येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी ज्येष्ठ नेते शेणफडराव घुबे यांनी सरकारवर टीका करत, शेतकर्यांसाठी लढणारे नेतृत्व आता लोकसभेत जाणं गरजेचे आहे. यापूर्वी ज्यांना लोकसभेत पाठवलं, त्यांनी शेतकरीहितासाठी काहीच केले नाही, तसेच जिल्ह्यासाठीही गेल्या पंधरा वर्षात काही केले नाही. या भागातील सिंचन, पाण्याचे, शेतीचे प्रश्न भरतभाऊ बोंद्रे यांच्यामुळेच मार्गी लागले, इतर फक्त श्रेय लाटण्याचे काम करत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे यावेळेस परिवर्तन करा, असे आवाहन त्यांनी केले. तर इसरूळचे फायरब्रॅण्ड युवा नेते राजू भुतेकर यांनी आपल्या आक्रमक भाषणात सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचे अक्षरशः भावाडे काढले. राजू भुतेकर यांच्या तडाखेबाज भाषणाने ही सभा त्यांनी जिंकून घेतली. तर ज्येष्ठ शेतकरी नेते भानुदास घुबे यांनी शेतकर्यांना वार्यावर सोडणारे नेतृत्व आता बदलले पाहिजे. शेतकर्यांच्या मागण्यांसाठी छाताडावर लाठाकाठ्या झेलणार्या रविकांत तुपकरांसारख्या नेत्याला यंदा लोकसभेत पाठवले नाही, तर तुमच्या भल्यासाठी यापुढे कुणी पुढे येणार नाही. तुपकरांना ताकद द्यावीच लागणार आहे. हे सरकार शेतकरीविरोधी असून, त्यांना शेतकर्यांशी काहीही देणंघेणं नाही, म्हणून ते शेतकर्यांना फसवत आहे, अशी टीकाही भानुदास घुबे यांनी केली. याप्रसंगी शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासारख्या शेतकर्यांच्या भल्यासाठी जीवावर उदार झालेल्या अभ्यासू नेत्याला लोकसभेत पाठवणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर शशिकांत मिसाळ यांनी या कार्यक्रमाचे महत्व अधोरेखीत करणारे भाषण केले. इतरही मान्यवरांची याप्रसंगी जोरदार भाषणे झालीत. या कार्यक्रमाचे बहारदार तथा जबरदस्त सूत्रसंचालन प्रा. उद्धव घुबे यांनी केले.
आपल्या घणाघाती भाषणात रविकांत तुपकरांनी राज्यातील तसेच केंद्रातील शेतकरीविरोधी सरकारचे वाभाडे काढले. तुपकर म्हणाले, की सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर आपण गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहोत. परंतु सत्तेच्या मस्तीत मश्गुल असलेले सरकार आपल्याला फसवत आहे. मागील ऑक्टोबर महिन्यापासून लाखो सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्यांच्या मागण्यांसाठी विविध टप्प्यांत आंदोलने करीत आहे. एल्गार मोर्चा, रथयात्रा, मंत्रालय ताब्यात घेणे, अन्नत्याग आदी आंदोलनाच्या माध्यमाने राज्य व केंद्र शासनाकडे मागण्या रेटल्या. सोयाबीन, कपाशीला दरवाढ, यलो मोझॅक, लाल्या, बोण्ड अळीमुळे झालेली नुकसानीची भरपाई, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीची भरपाई, सोयापेंड, पामतेल आयात बंद करावी या मागण्यांना राज्य व केंद्राने मान्यता दिली. मात्र कारवाई शून्य असून, शेतकर्यांना कवडीची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडला असताना मुख्यमंत्री शिवसंकल्प अभियान राबवून लोकसभेची तयारी करीत आहे. त्यांना शेतकर्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही की मदतीसाठी त्यांच्याजवळ पैसा नाही, असे विचित्र चित्र आहे. आता शेतकर्यांचा संयम संपल्याने रेल्वे रोको करण्यात येत आहे. सरकारला आम्ही १८ जानेवारीची मुदत दिली आहे. त्या मुदतीत मदत मिळाली नाही तर आंदोलन अटळ असल्याचे रविकांत तुपकर यांनी या जाहीर सभेतून ठणकावून सांगितले. १८ जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मलकापूर रेल्वेस्थानकातून मुंबई-दिल्ली-गुजरातकडे जाणार्या सर्व रेल्वेगाड्या अडविणार आहोत. मलकापूर रेल्वे स्थानकावर येणारी एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असे तुपकर यांनी नीक्षून सांगितले.
——–लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मिसाळवाडी गावातील शेतकर्यांनी १ लाख रुपयांचा धनादेश दिला.
———
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ व मिसाळवाडीतील तरूणांनी केले होते. ही सभा यशस्वी करण्यासाठी झटणार्या या नेत्यांसह गावातील तरूणांचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तोंड भरून कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले आहेत. मी माझ्या पुढं पुढं करण्यापेक्षा पडद्यामागे राहून ही सभा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणार्या या सर्वांना धन्यवाद देतो, असे तुपकर यांनी सांगून, गावातील तरूणाईला जोरदार बळ दिले आहे.