– देऊळगावराजा तहसीलदारांकडून अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल; या तोतयाचा पोलिस व गंडवले गेलेले वाळूतस्करही घेताहेत कसून शोध
बुलढाणा/देऊळगावराजा (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी असल्याचे सांगून एका भामट्याने चक्क वाळूचोरट्यांनाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला. या तोतयाने लाखभर रूपयेदेखील या वाळूतस्करांकडून उकळले. परंतु, वाळूतस्करापैकी एकाने या तोतयाची त्यांच्या महसूल विभागातील ‘सूत्रधारा’कडून खात्री केली असता, या तोतयाचे बिंग फुटले. त्याला बेदम चोप देत असताना हा तोतया आलिशान गाडी सोडून पळून गेला. याप्रकरणी देऊळगावराजा तहसीलदारांनी त्या तोतयाविरोधात अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, आता अधिक तपास पोलिस करत आहेत. या घटनेची देऊळगावराजा व चिखली तालुक्यात एकच खमंग चर्चा सुरू होती. दरम्यान, वाळूतस्करांना पाठिशी घालणारे काही अधिकारी मात्र या तोतयाविरोधात संतप्त झाले असल्याचे दिसून आले आहे. तर वाळूतस्करही त्या तोतयाचा त्यांच्या पातळीवर शोध घेऊन आपली लाखभर रूपयांची रक्कम वसूल करण्यासाठी आटापिटा करत होते.
विश्वासनीय सूत्रांकडून कळालेली माहिती अशी, की सिंदखेडराजा तालुक्यातील समृद्धी महामार्गालगत असोला जहांगीर परिसरात रात्रीच्या वेळी एका व्यक्तीने बुलढाणा जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करून या परिसरातून अवैध वाळूतस्करी करणार्या वाहतूकदारांकडून लाखोंची वसुली केली. हा अधिकारी खरेच जिल्हाधिकारी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी एका पंटरने त्यांच्या महसूल विभागातील ‘गॉडफादर’ला फोनाफोनी केली. त्यामुळे महसूलचा संबंधित ‘गॉडफादर’ही बुचकळ्यात पडला. काही पोलिसांनाही ही माहिती कळाल्याचे कळते. खरेच जिल्हाधिकारी साहेब आलेत की काय, म्हणून सर्वांची पाचावर धारणा बसली. परंतु, जिल्हाधिकारी बंगल्यावर काहींची फोनाफोनी झाली असता, ‘साहेब बंगल्यातच असून, आराम करत असल्याचे संबंधितांना कळले’ व तसे त्यांनी वाळूतस्करांना कळवले. तोपर्यंत या तोतया जिल्हाधिकार्याने लाखभर रूपयांची रक्कम उकळली होती.
जसा हा भामटा व्यक्ती जिल्हाधिकारी नाही, हे वाळूतस्करांच्या लक्षात आले तसे त्यांनी त्या भामट्याला चोप द्यायला व पैसे परत मागायला सुरूवात केली. त्यामुळे तो आणलेल्या आलिशान गाडीतून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग केला गेला असता, त्याने गाडी सोडून पळ काढला. अखेरीस संतप्त वाळूतस्करांनी या तोतया जिल्हाधिकार्याच्या आलिशान गाडीची तोडफोड केली. घटनेची माहिती कळताच काही अधिकारीही घटनास्थळी आले होते, असे कळते. आता याप्रकरणी देऊळगावराजा तहसीलदारांनी अंढेरा पोलिसात तक्रार दाखल केली असून, जिल्हाधिकारी असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या तोतया जिल्हाधिकार्याचा शोध घेत आहेत. तसेच, ज्यांचे पैसे लुबाडण्यात आले ते वाळूतस्करही या तोतयाचा शोध घेत असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.