– अपुर्या पावसामुळे राज्यातील २१८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, केंद्रीय मदतीची प्रतीक्षा
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्यासह राज्यात केंद्र सरकारची चार पथके आज दाखल झाली. या पथकाची बैठक आज (दि.१२) पुण्यातील विभागीय आयुक्तालयात झाली. विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अधिकार्यांनी आपापल्या विभागाची माहिती केंद्रीय पथकांना दिली. या भागात आवश्यक असणार्या उपाययोजनांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर हे पथक बारामती, पुरंदर, इंदापूर, शिरुर येथे आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करणार आहे. चार दिवसांच्या दौर्यामध्ये पथकामधील अधिकारी ग्रामस्थांशी संवाद साधणार असून, १५ डिसेंबरला पुन्हा संवाद साधल्यानंतर हे पथक संपूर्ण परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे. अपुर्या पावसामुळे राज्यातील १५ जिल्ह्यातील २१८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून, या पथकाच्या पाहणी दौर्यात विदर्भातील गावांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाच्या दोन टीम मराठवाडा विभागात दाखल झाल्या असून, दिनांक १३ आणि १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत. या दोन टिममध्ये एकूण पाच जणांचा समावेश असून, नऊ तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. या पाहणी दौर्यासाठी प्रशासनाने चोख तयारी केली आहे. केंद्रीय पथकामध्ये सहसचिव प्रिया राजन यांच्यासह ९ मंत्रालयातील १२ वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. पाहणी दौरा आटोपल्यानंतर १५ डिसेंबररोजी या टीम पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला उपस्थित राहून पाहणीदरम्यान आढळून आलेल्या परिस्थितीबाबत मांडणी करणार आहेत. दुष्काळाच्या मदतीसाठी केंद्रीय पथकाचा अहवाल महत्वाचा असल्याने प्रशासनाकडून दौर्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे.
विभागात ७६ टक्केच पावसाची नोंद
जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात विभागात सरासरी ७५० मि.मी. पाऊस होतो. यावर्षी मात्र केवळ ५७७.३९ मि.मी. पावसाची म्हणजे ७६.९० टक्के पावसाची नोंद झाली आहे. या काळीत २५ टक्यांची घट झाल्याने विभागातील ११ तालुके दुष्काळी तालुके म्हणून शासनाने घोषीत केले आहेत. जालना, बीड, लातूर धाराशीव आणि परभणी या जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्केच पावसाची नोंद झाली. तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आणि ७५ ते १०० टक्के पाऊस झाला.
एक टीम छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे दर दुसरी टीम बीड आणि धाराशीव या जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत. पहिल्या टीममध्ये जलसंपदा विभागाचे हरीश उंबरजे आणि कापूस विकास विभागाचे ए.एल. वाघमारे यांचा समावेश आहे. तर दुसर्या टीममध्ये उपसचिव मनोज के, निती आयोगाचे शिवचरन मिना आणि मोतीराम यांचा समावेश आहे. पहिले पथक १३ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील दोन तालुक्यातील ११ गावांची पाहणार करणार आहेत. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांची पाहणी करणार आहेत. तर दुसरे पथक हे १३ डिसेंबर रोजी बीड जिल्हातील शिरूर कासार आणि वडवणी तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी धाराशीव जिल्ह्यातील वाशी आणि धाराशीव या तालुक्यातील दुष्काळी गावांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.