बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील हत्ता शिवारात शेतकर्याने तुरीच्या शेतात गांजाची झाडे लावली. तब्बल तीन एकरात ३०० गांजाची झाडे सापडली असून, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)च्या पथकाने टाकलेल्या धाडीत हे पितळ उघडे पडले आहे. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हत्ता शिवारातील गट नंबर १८१ मध्ये अनिल धुमा चव्हाण यांच्या तुरीच्या शेतात जागोजागी विरळ ठिकाणी गांजाची लागवड केली असून, याबाबतची गुप्त माहिती बुलढाणा गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. ही माहिती मिळताच या पथकाने शेतात धाड घालून प्रत्यक्ष पाहणी केली असता, तुरीच्या शेतात गांजाची लागवड दिसून आली. तब्बल तीन एकरामध्ये तुरीच्या शेतात विरळ ठिकाणी अंदाजे ३०० गांजाच्या झाडाची लागवड झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येते आहे. या गांजाची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. सदर कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, पीएसआय सचिन कानडे, पोहेकॉ बकाले, नापोकॉ राजेश शेजुळ, पोकॉ वैभव मगर, मनोज खाडे, दीपक वायाळ, महिला पोलीस वनिता शिंगणे आदींनी केली. सदर कारवाई मोठी असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणार असून, आरोपींनाही अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. किती लाखांचा गाजा पकडला हे संपूर्ण झाल्यानंतरच कळेल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. या कारवाईने जिल्ह्यात गांजा लागवड करणार्या शेतकर्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.