बिबी (ऋषी दंदाले) – कापूस व सोयाबीन दरवाढीच्या प्रश्नावर व दुष्काळाची व विम्याची शंभर टक्के नुकसान भरपाई येत्या २८ तारखेपर्यंत न दिल्यास शेतकर्यांना सोबत घेऊन २९ तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांना बिबी पोलिसांनी कलम १४९ नुसार नोटीस बजावून त्यांना तुपकरांच्या शेतकरी आंदोलनातून रोखण्याचा प्रयत्न चालविला आहे.
यावर्षी दुष्काळामुळे सोयाबीन व कापसाच्या पिकामध्ये उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतकर्यांनी महागडी खते, बी बियाणे जमिनीमध्ये टाकून आपले पीक जगवले होते. परंतु उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकर्यांनी शेतीमध्ये लावलेला खर्चसुद्धा वसूल होत नाही. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून सरकारच्यावतीने अद्यापपर्यंत शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची मदत किंवा पीक विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली नाही. तरी दुष्काळाची मदत कापूस व सोयाबीन दरवाढ व १०० टक्के पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी व कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जाग करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० नोव्हेंबरला बुलढाणा येथे एल्गार मोर्चा काढून मोर्चामधून सरकारला सात दिवसात शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा २९ तारखेला मुंबई येथील मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांना आज बिबी पोलिसांनी नोटीस दिली आहे. तसेच, कारवाईचा इशारादेखील दिला आहे. तथापि, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी सांगितले की, अशा कितीही नोटीस आल्या तरी मी त्यांना भीक घालत नाही आणि कितीही नोटीस आल्या तरी आपण आंदोलनात जाणार, असे सहदेव लाड यांनी सांगितले.