सिंदखेडराजा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला; पण चोरटा वाहन सोडून शेतात पळाला!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीचे रॅकेट सक्रीय असून, याबाबतची माहिती सिंदखेडराजा पोलिसांना गुप्तबातमीदारामार्फत मिळताच पोलिसांनी पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग केला. परंतु, पोलिस मागे लागल्याची कुणकुण लागल्याने चोरट्याने गाडी सोडून शेतात पळ काढला. पोलिसांनी या गाडीसह डिझेलच्या कॅन ताब्यात घेतल्या असून, चोरट्याचा व त्याच्या रॅकेटचा युद्धपातळीवर शोध सुरू केला आहे.
समृद्धी महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना फरदापूर हद्दीमधून पांढर्या रंगाची स्कार्पिओ गाडी ही चोरी करून दुसरबीडमध्ये येत असल्याची माहिती पीएसआय जितेंद्र राऊत यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यामुळे राऊत व त्यांच्या सहकार्यांनी सरकारी वाहनाने या गाडीचा पाठलाग करीत सदर गाडी क्रमांक (एमएच ०६ एझेड ७०९३) ही चॅनल नं ३०९.१ नागपूर कॅरिडोरच्या बाजूला उभी करून आरोपी शेतामध्ये पळून गेला. सदर गाडीमध्ये डिझेलने भरलेली कॅन व पाच रिकाम्या कॅन आढळून आल्या आहेत. पीएसआय जितेंद्र राऊत, पवार, मिलिंद ताकतोडे, मुकेश जाधव, अरुण भुतेकर यांनी ही गाडी ताब्यात घेतली असून, त्यांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हे कर्मचारी बरेच दिवसांपासून समृद्धी महामार्गावर डिझेल चोरणार्या टोळीच्या मागावर आहेत. लवकरच ही टोळी हाती लागेल, असा त्यांना विश्वास आहे.