– २५ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया तर २२ ऑक्टोबरला लेखी परीक्षा
– मेहकर तालुक्यातील भरली जाणार २० पदे
बुलढाणा (बाळू वानखेडे) – लांबत गेलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लांबलेल्या जिल्ह्यातील कोतवाल भरतीचा सुधारित कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी अखेर जाहीर केला आहे. यासाठी इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे अवश्यक आहे. रिक्त पदासाठीची आरक्षण सोड़त गुरूवारी, २१ सप्टेंबररोजी संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. यासाठी अर्ज घेणे २५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, २२ ऑक्टोबररोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील २० पदे भरली जाणार असल्याचे तहसीलदार नीलेश मड़के यांनी सांगितले.
कोतवाल तसा तलाठी व गाव यामधील महत्त्वाचा दुवा. तलाठी गावासाठी नवीन असला तरी कोतवाल त्याच गावातील रहिवासी असल्याने त्याला गावातील खड़ा न खड़ा माहिती असते. त्यामुळे तलाठ्याला काम करणे सोयीचे तर जातेच पण तक्रारीही कमी होतात. जिल्ह्यात १३ तालुक्यात ५३५ तलाठी सज्जे असून अनेक सजातील कोतवालाची पदे बरेच दिवसापासून रिक्त आहेत. शासनाने आता रिक्त पदाच्या ८० टक्के पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार गेल्या महिन्यातील भरती प्रक्रिया शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे लांबली होती. सदर भरती प्रक्रियेचा सुधारित आदेश जिल्हाधिकारी ड़ॉ.किरण पाटील यांनी १५ सप्टेंबर रोजी काढला आहे. यानुसार संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. रिक्त पदासाठीची आरक्षण सोड़त संबंधित तहसील कार्यालयात २१ सप्टेंबररोजी काढण्यात येणार आहे. यामध्ये तहसीलदार यांनी जाहिरात प्रसिद्ध करणे २५ सप्टेंबर, अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्ज छाननी ९ ऑक्टोबर, आक्षेप ११ ऑक्टोबर, लेखी परीक्षा २२ ऑक्टोबर, अंतिम निकाल ३० ऑक्टोबर व निवड़ झालेल्यांना नियुक्तीपत्रे देणे ३१ ऑक्टोबर याप्रमाणे प्रक्रिया पार पड़णार आहे. यासाठी इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. कोतवालाची रिक्त पदे भरताना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित निवड़ समिती व नियुक्ती प्राधिकारी यांची राहील, असेही सदर आदेशात म्हटले आहे.
मेहकर तालुक्यात मेहकर भाग एक, अंत्री देशमुख, वड़ाळी, देऊळगाव साकरशा, उटी, आंध्रुड़, विश्वी, ड़ोणगाव भाग एक, मादणी, सोनाटी, बोरी, उकळी, देऊळगाव माळी, वड़गाव माळी मोहखेड़, शेलगाव काकड़े, ब्रम्हपुरी, जानेफळ भाग एक, हिवरा खुर्द भाग एक, कळंबेश्वर, सारशिव, नायगाव दत्तापूर, शेंदला, भालेगाव,व सारंगपूर आदि सजातील २५ पदे रिक्त असून, यासाठीची आरक्षण सोड़त गुरूवारी मेहकर येथील तहसीलदार कार्यालयात दुपारी २ वाजता काढण्यात येणार आहे. यातील २० पदे भरण्यात येणार असल्याचे मेहकरचे तहसीलदार नीलेश मड़के यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले आहे.
————