रायपूर ठाणेदारांची साफसफाई जोरात; आधी चोरटे, आता हाती झाडू घेऊन सैलानीत स्वच्छता मोहीम!
– पोळा सण व अमावस्येनिमित्तची यात्रादेखील शांततेत!
चिखली (महेंद्र हिवाळे) – रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांची साफसफाई मोहीम सद्या जोरात सुरू आहे. अलिकडेच त्यांनी प्रसिद्ध सैलानी येथे चोरट्यांची साफसफाई करून चोरट्यांचा सुळसुळाट संपवला होता. आता त्यांनी हाती चक्क झाडू घेऊन सैलानी येथे साफसफाई मोहीम राबविली. ठाणेदारांच्या या कृतीचे सर्वांनी कौतुक केले आहे.
चोरट्यांची साफसफाई बरोबर स्वतः हातात झाडू घेऊन घाण-काचर्याची साफसफाई दर्गा सैलानी येथे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी करून वेगळा आदर्श निर्माण केला. पोलिस म्हटले की सामान्य माणसाच्या मनामध्ये भीतीचे वातावरण असते. परंतु नियमांचे काटेकोरपणे पालन करून रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दुर्गेश राजपूत व इतर कर्मचारी यांनी सैलानी येथील मुजावर यांना सोबत घेऊन रस्त्यावर तसेच सैलानीबाबा दर्गा परिसरात साफसफाई मोहीम राबविली. रायपूर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सैलानीबाबा येथे पोळासण व अमावस्यानिमीत्त महाराष्ट्र व परराज्यामधून लाखो भाविक दाखल होत असतात. यात्रेदरम्यान पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, अपर पोलीस अधीक्ष बी.बी.महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी बंदोबस्त व वाहतुकीचे योग्य नियोजन करून सैलानीबाबा यात्रा चांगल्या पद्धतीने व शांततेत पार पाडली. यात्रेदरम्यान एकूण ४० बेशिस्त वाहनधारक यांच्यावर कारवाई करून १२ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार, मोबाईल चोर हे चोरी करत असतात. परंतु यावर्षी ठाणेदार राजपूत यांनी याबाबत दर्गा व झिरां परिसरात योग्य खबरदारी घेत एकूण ८ चोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे पाकीटचोरी, मोबाईल चोरी, मोटार सायकल चोरी यावर्षी घडलेल्या नाहीत.
सैलानी परिसरात साफसफाईकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे, तरी ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी भाविकांची मागणी आहे. जे ग्रामपंचायतीचे काम आहे, ते ठाणेदारांनी केल्याने सर्वांनी कौतुक केले आहे.
ठाणेदार राजपूत यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच पोळा अमावस्या असून, त्यांनी खूप चांगले नियोजन केल्याने हा सणही निर्विघ्न पार पडला. यानिमित्त यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने अस्वच्छता, कचरा, घाण मोठ्या प्रमाणावर झाली होती. स्वच्छताप्रेमी असलेले ठाणेदार राजपूत यांनी त्या अनुषंगाने त्यांनी स्वतः आपल्या सहकार्यांसह सैलानी येथील मुजावर यांना सोबत घेवून सैलानी येथील दुकानदार, व्यावसायिक यांना मार्गदर्शन करून व स्वतः हातात झाडू व टोपली घेवून स्वच्छता केली. तसेच सैलानी येथील दुकानदार, व्यावसायिक यांना स्वच्छतेबाबत आवाहन केल्याने सामान्य लोकांनी सुध्दा साफसफाईच्या कामास हातभार लावून स्वच्छता केली. दुकानासमोरील स्वच्छतेबाबत जागरूक राहून दररोज स्वच्छता करावी. तसेच जे व्यावसायीक, दुकानदार स्वच्छता न करता अस्वच्छता पसरवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा यावेळी ठाणेदार राजपूत यांनी दुकानदार, व्यावसायिक यांना दिला.