मराठा आरक्षणासाठी काल जिल्हा मुख्यालय येथे मराठा क्रांती मोर्चा पार पडला. समाजातील फटका माणूस गाडी घोड घेऊन मोर्चासाठी धावून आला असताना नेत्यांनी मात्र समाजाकडे अर्थात मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यात सात आमदार आहेत. त्यात आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे ,संजय कुटे, आकाश फुंडकर, डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मराठा /कुणबी परीघातले आहेत. एकमेव अपवाद आमदार संजय रायमुलकर, धीरज लिंगाडे यांचा आहे. म्हणजेच बुलढाण्याचे राजकारणातील प्रभावी घटक कुणबी मराठा हाच आहे. याच परिघातील प्रतापराव जाधव हे खासदारदेखील आहे. कुणबी मराठा असा वाद जिल्ह्यात फारसा नसला तरी त्याला आता राजकीय हवा देण्याच काम काही पक्षाकडून सुरू आहे.
कुणबी हेच मराठा!
प्रत्येक मराठा हाच कुणबी हे समीकरण मराठा समाजाचे नेते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी त्याकाळी मांडले. मराठ्यांसाठी कुणबीची जी तरतूद झाली ती अर्थातच भाऊसाहेबांच्या पुण्याईने. शेती करतो ..शेतीमध्ये बीज पेरतो.. तो कुणबी असा सरळ सरळ अर्थ कुणब्यांचा शेतीशी जोडला गेला आहे. असे असताना आरक्षणाचा मुद्दा हा ‘मराठवाड्यातील मराठ्यांचा’ असा प्रचारदेखील करण्यात आला. त्याला काही राजकीय पक्षांनी पद्धतशीरपणे हवा देणे सुरू केलय. मराठा आरक्षण ओबीसीत समाविष्ट करणार की कसे ? आज रोजी सारच गुलदस्तात आहे. जरंगे पाटील यांनी केलेली मागणी आरक्षणाची तर आहेच पण मराठा हा आधि कुणबी आहे अशी देखील आहे. त्यामुळे ही मागणी अवास्तव आहे असे विरोधक देखील म्हणू शकणार नाही. झालेल्या शेतकरी आत्महत्यांची नोंद जर तपासली तर आत्महत्या करणारे शेतकरी सर्वाधिक कुणबी मराठा हेच सापडतील. त्यामुळे शेतीशी संबंध म्हणजे कुणबी होय.’कुणबीक’ मराठ्यांनी केली व करीत आहेत हे वास्तव नाकारणे शक्यच नाही. बारा बैलांची- सहा बैलांची कुणबीक असे शब्द आजही ग्रामीणमध्ये बोलले जातात ते आले कुठून? मराठा हा कुणबीच आहे आणि नांगर सोडून तलवार धरणारा कुणबी हा मराठाच आहे हे वास्तव राज्यकर्त्यांना का दिसत नाही. आरक्षणाचा मुद्दा केंद्राकडे असल्याने व केंद्राची फारशी तयारी नसल्याने त्यांचे वेळ काढून धोरण सुरू आहे. सध्या ईडीमुळे भाजपच्या दावणीला जवळजवळ नेते बांधले गेलेत. राष्ट्रवादीचा मोठागट, शिंदेंचा मोठा गट ,भाजपातील मराठा आमदार यांना खुर्ची जवळची असल्याने समाज वार्यावर सोडल्याचे चित्र आहे. आज समाज रस्त्यावर येत असताना नेते मात्र शब्द काढायला तयार नाही. बुलढाणात आयोजित मोर्चात हेच चित्र पुढे आले.
गैर मराठा नेतेही दूरच ..
ज्यांच्या समाजाची चार दोन घर आहेत, मात्र मराठ्यांच्या पाठबळावर कितीतरी वेळा आमदार झाले, मंत्री झाले, वेगवेगळ्या पदावर पोहोचले अशांनी देखील मोर्चाकडे पाठ फिरवली. मराठा नेते सत्तेत बांधील तर गैर मराठा नेते ओबीसी दुखावतील यामुळे तिकडे जाणेच नको अशा भूमिकेत दिसून आले. निघालेला मोर्चातून मराठा समाजाच्या तरुणांना राजकीय नेत्यांनी द्यायचा तो संदेश दिला आहे. त्यामुळे समाजाने आता डोळसपणे या सर्व घडामोडी बघायला हवे.
शेळके– देवकर एकाकी लढले!
कालच्या मराठा मोर्चा यशस्वी करण्यासाठी काही नेत्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यात राजकीय महत्त्वाकांक्षा असणार्या व त्या उघड बोलून दाखवणारे संदीप शेळके यांनी घेतलेली उघड सामाजिक भूमिका कौतुकास्पद आहे. त्यांच्या जोडीला वैचारिक पायाभर भक्कम असणारे सुरेश देवकर यांनी तन-मन-धनाने मोर्चात सहभाग घेतला हे विशेष. समनवयकांनी घेतलेली मेहनतही तितकीच तोलामोलाची आहे.