उदयनगर, ता. चिखली (प्रतिनिधी) – उदयनगर येथे शासकीय मुद्रांकांची अव्वाच्या सव्वादराने खुलेआम विक्री सुरू असून, मुद्रांक विक्रेते सर्वसामान्य नागरिकांना सर्रास लुटत आहेत. याबाबत एका मुद्रांक विक्रेत्याविरोधात चिखली तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मुद्रांकविक्रेत्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील मुद्रांक विक्रेत्यांवर छापे टाकून खातरजमा करावी, व नियमबाह्यपणे पैसे घेणा-यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
उदयनगर येथे अतिरिक्त दराने मद्रांक विक्री होत असल्याची तक्रार रमेश कचाले व श्रीहरी बराटे रा. किन्हीसवडत यांनी मुद्रांक विक्रेते कैलास सरजने याच्याविरोधात १२ सप्टेंबररोजी तहसीलदार चिखली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात नमूद आहे, की चिंचपूर तालुका खामगांव येथील कैलास विश्वंभर सरजने हे उदयनगर येथील दुकानात १०० रुपयाचा मुद्रांक १२० ते १३० रुपयांपर्यंत विकत असून, मुद्रित (टायपिंग) करायचे असल्यास ६० रूपये अतिरिक्त व प्रतिज्ञापत्र करायचे असल्यास १०० रूपये असे २८० ते ३०० रूपयेपर्यंत प्रत्येक व्यक्तीकडून लुबाडणूक करत आहे. तरी सदर होत असलेली पैशाची लूट थांबण्यात यावी व आजपर्यंत ज्या लोकांनी कैलास सरजने याच्याकडून मुद्रांक खरेदी केलेली असेल, त्यांच्याकडून चौकशी करून सरजने याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रमेश अर्जुन कचाले व श्रीहरी पुरुषोत्तम बराटे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.