बुलडाणा (राजेंद्र काळे) :- ती सापडली, अलाहबाद कुंभमेळ्यात. हरवली होती की सोडून दिली.. कुणास ठाऊक? तिलाही सांगता येत नव्हतं, कारण ती मुकबधीर. साधारणत: २० वर्षांपूर्वी, ३ वर्षांची असेल ती, उमलू पाहणारी कोवळी कळी. शंकरबाबा पापळकरांनी तिला आणलं. अशा दिव्यांग व विकलांगांसाठी साकारलेल्या हक्काच्या निवाऱ्यात, स्व.अंबादासपंत वैद्य बालगृहात. याठिकाणी अशा जवळपास दिडशे मुला-मुलींना बाबांनी त्यांचं नाव व आडनाव लावलं आहे, जाती-धर्माच्या पलीकडे जावून उभा केलेला बाबांचा हा आगळा-वेगळा संसार. जशी सलमा शंकरबाबा पापळकर तशीच कु.दिपाली शंकरबाबा पापळकर!_
_‘यहाँ न धर्म न मजहब की बंदीसे कोई,_
_यहाँ न मुल्क न देशो की सरहदे कोई..’_
शंकरबाबा उर्दू शायरीचे रसीक. धुणी धुणारा गाडगेबाबांच्या वंशातला हा अवलीया माणूस, पण कपड्यांची धुणी धुत बसण्यापेक्षा समाजाचीच धुणी धुवू या.. या विचारांनी झपाटलेला, तेवढाच शासकीय लालफित शाहीने ग्रासलेला. म्हणून अनेक संस्था बंद पाडल्या, अन् हे बालगृह सुरु ठेवलंय ते शासकीय अनुदानाविना.
असो, तो मोठा व गहन विषय!
_दिपाली, चेहऱ्यावर दिव्यासारखं तेजोवलय असणारी. वयात आल्यावर बाबांनी जोडीदाराचा शोध सुरु केलाय, राधेश्याम चांडक उपाख्य भाईजींपर्यंत विषय आला, अशी आतापर्यंत बाबांनी २३ मुलींची लग्न लावून दिली, दिपाली २४ वी. यातल्या २ लग्नांना भाईजी उपस्थित होते. आता आयोजकच होवू या, या धारणेतून भाईजींनी वर संशोधन सुरु केले. म्हणतात ना, काखेत कळसा व गावाला वळसा. बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेतच काम करणाऱ्या प्रिती कोलारकर यांच्या शेजारी बिहारीलाल जांगीड यांचा आशिष हा मुकबधिर मुलगा होता, तेही वधूच्या शोधात होते. मग काय, चट मंगणी-पट ब्याह. बघण्याची औपचारीकता झाली अन् विवाह ठरला. बुलडाणा अर्बनच्या तोरणदारी सहकार सांस्कृतिक भवनात मांडव सजला. ५जुलै रोजीच्या मुहूर्तावर दिपाली-आशिष यांच्या स्वर्गात बांधल्या गेलेल्या लग्नाची गाठ पृथ्वीवर घट्ट झाली. तामिळी, महाराष्ट्रीयन, राजस्थानी पध्दतीने दोन जीवांचे मिलन झाले. दिपाली अन् आशिष.. दिपाशिष!_
_मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे.._
*विवाह ठरला राष्ट्रीय महोत्सव!*
_‘कौन किसका हबीब होता है, कौन किसका रकीब होता है.._
_बन जाते है रिश्ते-नाते, जहाँ जिसका नसीब होता है!’_
तिच्या नशीबानं तिचं बालपण जरी हिरावून घेतलं असलं तरी शंकरबाबा पापळकरांनी तिला लावलेली माया, ही मातृत्व व पितृत्वाची पावतीच होती. तिच्या नशीबानं मांडलेली थट्टा संपलेली होती, अन् आता तर तिला तिचा राजकुमार अगदी तिच्यासारखाच भेटला होता. _‘मुका पाऊस मुक्याने एकांती बोलला होता,_
_त्याचा हुंदका तिच्या गळ्याशी दाटलेला होता..’_
ती मुकबधीर अन् तोही तसाच.
_‘कौन कहता है मोहब्बत की जुबाँ होती है,_
_ये हकीकत तो निगाहों से बयाँ होती है..’_
डोळ्यांची भाषा डोळ्यांना कळली व हातवाऱ्यातून ऐकमेकांशी महान संवाद झाला, तो ‘महान’ या पर्यटन स्थळावर. मग ठरलं, राधेश्याम चांडक उपाख्य भाईजींनी आयोजनाची तथा डॉ.सुकेश झंवर व कोमलताई झंवर यांनी संपुर्ण नियोजनाची जबाबदारी उचलली. बुलडाणा अर्बन परिवारात लगीनघाई दिसू लागली, पत्रिका अन् निमंत्रणाची लगबग सुरु झाली, पंगतीचे मेनू ठरले.. मग अक्षदांच्या वर्षावात गुंजले मंगलाष्टकांचे स्वर..
कुर्यात सदा मंगलम्!!
शंकरबाबा पापळकर यांनी आतापर्यंत जेवढी काही लग्न केली ती, अशाच सामाजिक माध्यमातून. दिपाली ही बाबांची तशी लाडकी लेक, तशा सर्वच लाडक्या. कारण बापाला भेदभाव केल्या जात नाही. आश्रमातल्या पोळ्यांची जबाबदारी दिपालीकडे होती, ते काम ती अतिशय चोखपणे बजावून जो कोणी आश्रमात येईल त्याचं स्वागत करण्याची जबाबदारी ती लिलया पेलत होती. त्यामुळे अशी दिपाली निघून जाणार, या भावनेनेच शंकरबाबा भावव्याकुळ होत होते. नियोजनासाठी जेंव्हा बुलडाणा अर्बनमध्ये आले तेंव्हा त्यांची ही व्याकुळता प्रकर्षाने जाणवत होती. दिपालीचं लग्न चांगलंच झालं पाहिजे, हा त्यांचा हट्ट होता. परंतु झालं काय, बालगृहातील २ मुलं त्याच दिवशी गॅस्ट्रोनं सिरीयस होवून भरती झाल्याने..
_याच देही याच डोळा,_
_नाही बघितला बाबांनी सोहळा!!_
दिपाली अन् आशिष, यांच्या लग्नाचं आवतन जेंव्हा जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांना पोहोचलं.. तेंव्हा त्यांनी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.राजेश्वरी रामामुर्ती यांनी ठरवलं कन्यादान करण्याचं. हे दाम्पत्य तामिळनाडूचं, त्यामुळं हा सोहळा तामिळी पध्दतीने सुध्दा झाला पाहिजे..हा त्यांचा आग्रह. तर लग्न हे महाराष्ट्रात होत असल्यामुळे ते मराठी पध्दतीनंही झालं पाहिजे, ही एक भावना. तर मुलगा हा मूळचा राजस्थानी असल्याने फेऱ्याच्या माध्यमातून राजस्थानी पध्दतीनंही करण्याचं ठरलं. एकाच लग्नात देशात नांदणाऱ्या ३ विवाह संस्कृती बघायला मिळणार असल्याने, याला जिल्हाधिकाऱ्यांनीच ‘राष्ट्रीय महोत्सव’ ही उपमा दिली. जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया मुलीचे मामा बनले. विभागीय आयुक्त परणीत कौर यांच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त शामकांत म्हस्के खास अहेर घेवून आले होते. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पदाधिकारीही सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी १८ वर्षावरील विकलांग व दिव्यांग मुला-मुलींच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व शंकरबाबा पापळकर या दोघांची भेट घडवून आणण्याची ग्वाही या विवाह सोहळ्यात वधु-वरांना शुभेच्छा प्रदान करतांना दिली. अनंताभाऊ देशपांडे यांनी तयार केलेली मंगलाष्टके गायली. रविवार ३ जुलैला साक्षगंध अन् मेहंदी झाली, सोमवार ४ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी हळदीचा कार्यक्रम तामिळी पध्दतीने झाला, संगीत रजनीत नृत्य व अन्य सांस्कृतिक अविष्कार पार पडले. मंगळवार ५ जुलै रोजी बँड-बाजा-बारात अशा पध्दतीने नवरदेवाची धुमधडाक्यात घोड्यावरुन वरात निघाली. नवरी नटून-थटून तयार झाली, अन् पार पडला..
आगळा-वेगळा वैवाहिक राष्ट्रीय महोत्सव!!
_‘विवाह म्हणजे योग नावाच्या शिंपल्यात स्वाती नक्षत्राचं येणं, विवाह म्हणजे विणेवर झंकारणारं गाणं’ अशा या आगळ्या-वेगळ्या विवाह सोहळ्यात भाईजींनी प्रास्ताविकातून ज्यांच्यावर निसर्ग अन्याय करतो, त्याला न्याय देण्यासाठी देवदुताच्या रुपाने कोणीतरी पुढे येत असतो.. तीच भावना या विवाह सोहळ्यातून जाणवल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनातील तथा पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी या प्रसंगी मेहमान म्हणून नव्हे यजमान म्हणून उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सदिच्छांसह हा.._
*विवाह ठरला राष्ट्रीय महोत्सव!!*