BULDHANAHead linesVidharbha

बुलढाणा न्यायालयाचे कामकाज आता होणार ‘पेपरलेस’!

बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी, १९ ऑगस्टरोजी ई-फायलिंग व फॅसिलिटी सेंटरचे उदघाटन करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज आता पेपरलेस पद्धतीने होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.आशीष देशमुख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय हिंमतराव सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वकील संघाचे पदाधिकारी अ‍ॅड. जयसिंग देशमुख, अ‍ॅड.राहुल दाभाडे, न्यायाधीश, बुलढाणा न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी, बहुसंख्येने उपस्थित होते.

उच्च न्यायालय व महाराष्ट्र- गोवा वकील संघाच्या पुढाकाराने केंद्र कार्यन्वित करण्यात आले आहे. यासाठी प्रमुख जिल्हा न्यायालयात ‘ ई-फायलिंग व फॅसिलिटी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. आजपासून दाखल करण्यात येणारी न्यायालयीन प्रकरणे या केंद्रातून ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून ?ड. सौरभ ढगे तर तांत्रिक प्रमुख म्हणून प्रदीप शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयात कोणतेही प्रकरण दाखल करताना कागदांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. आजपासून जिल्हा न्यायालयात इ -फायलिंग द्वारेच नवीन प्रकरणे दाखल करण्यात येणार आहे. वकिलांची गैरसोय टाळण्यासाठी न्यायालयातच केंद्र सुरू करण्यात आले आहे. तिथे अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली असून ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे न्यायालयाचे कामकाजात आणखी पारदर्शकता येणार असून वेळेचा अपव्यय व अनावश्यक गर्दी टाळणे शक्य होणार आहे.

प्रारंभीच्या टप्पात जिल्हा न्यायालयात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल. बुलढाण्यात आजपासून ती कार्यान्वित झाली आहे. नंतरच्या टप्पात तालुका न्यायालयात कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी २० सप्टेंबर २०२३ ची मुदत देण्यात आल्याचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय हिंमतराव सावळे यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन, पेपरलेस कोर्ट निर्माण व्हावं, त्याचबरोबर वकील आणि पक्षकार यांच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार अशी अपेक्षा अ‍ॅड. देशमुख यांनी बोलून दाखविली. ई फाईल केंद्रामुळे कामाला गती मिळणार असून, वकील आणि पक्षकार यांच्यासाठी कामकाज सुखकर होऊन, पारदर्शकता येणार असल्याचे अ‍ॅड. विजय सावळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!