महाराष्ट्राप्रमाणे तेलंगणा सरकार मराठा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार!
सुनील जवंजाळ आणि सहकार्यांच्या मागणीला यश!
बुलढाणा (संजय निकाळजे) – महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर तेलंगणा राज्यामध्ये राहणार्या २७ ते २८ लाख मराठा बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी ‘मराठा सोयरीक’चे सुनील जवंजाळ यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेथे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. जवंजाळ यांनी हैद्राबाद येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यानी सचिवांना तसे निर्देशही दिले आहे.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सुनील जवंजाळ यांनी बरेच उपक्रम राबविले आहे. त्यामधील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मराठा समाज सामूहिक विवाह चळवळ त्यांनी राज्यस्तरावर नेली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सामूहिक विवाह सोहळे कमी खर्चात घडून आणले. याशिवाय विधवा विवाह सुद्धा त्यांनी घडवून आणले. समाजामध्ये वैचारिक बीजे रोवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. महाराष्ट्रामध्ये शेती करणारा वर्ग म्हणून मराठा समाजाची गणना होते. शेतीची अवस्था अत्यंत बिकट आहे. पीकेल ते विकेल का हा प्रश्न आहे. वर्षभर घाम गाळूनही दोन पैसे हातात येतील की नाही हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत मराठा तरुणांना आधार मिळावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून तरुणांना कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. यामध्ये काही तरुणांनी उद्योग व्यवसाय उभा केला आहे. तर काही किचकट निकषांमुळे आजही अनेकांना कर्ज उपलब्ध होत नाही. मात्र याच धर्तीवर तेलंगणा राज्यातही एखादे महामंडळ असावे यासाठी सुनील जवंजाळ पाटील यांनी आज मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीसाठी पत्रकार गणेश निकम केळवदकर व सुनील जवंजाळ यांचे प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये हैदराबाद येथील प्रमुख मराठा समाजातील मान्यवर देखील उपस्थित झाले. प्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन दीड तास चर्चा केली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. तेलंगणामध्ये असणार्या मराठा बांधवांची संख्या पाहता येथे एखादे आर्थिक विकास महामंडळ असावे ही संकल्पना त्यांनाही आवडली व त्यांनी लागलीच सचिवांना बोलऊन याबाबत निर्देशही दिले. त्यामुळे तेलंगणामध्ये मराठा तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यासाठी सुनील जंजाळ पाटील,पत्रकार गणेश निकम यांच्यासह हैदराबाद येथील मराठा बांधव यांनी परिश्रम घेतले.
हैदराबादमध्ये पार पडला मराठा मेळावा!
हैदराबाद शहर आणि परिसरामध्ये मराठी भाषिक व मराठा समाजाच्या कुटुंबांची संख्या बरीच मोठी आहे. या परिसरामध्ये २७ ते २८ लाख लोक वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. हैदराबाद येथील मराठा तरुणांनी एका मेळाव्याचे आयोजनही केले होते. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व त्यांचे मंत्री यादव यांना निमंत्रित केले होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्य पार पडला. त्यानंतर संध्याकाळी प्रदेश अध्यक्ष मणिक कदम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. यावेळी ही मागणी करण्यात आली. तिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी आनंद बिरादार, प्रा ज्योती शिंदे, परीक्षेत नलावडे, विठ्ठल लामतुरे, प्रा माधवराव बिरादार, साईदीप अक्षय पाटील इत्यादी स्थानिक मंडळी हजर होती.