बिबी (ऋषी दंदाले) – भरपावसात अचानक रोहित्र (डीपी) जळाले. त्यामुळे बिबीसह परिसरातील गावे अंधारात बुडाली. ग्रामस्थांची होणारी दैना पाहाता, महावितरणच्या कर्तव्यदक्ष कर्मचार्यांनी भरपावसात काम करून तातडीने हे रोहित्र बदलून नवीन रोहित्र बसविले व बिबीसह परिसरातील गावांचा वीजपुरवठा सुरूळीत केला. या कर्तव्यदक्ष कर्मचार्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
सविस्तर असे, की बिबी येथील रोहित्र दिनांक १८ ऑगस्टरोजी अचानक जळाले. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तातडीने महावितरणच्या कर्मचारी व अधिकारीवर्गाला दिली. महावितरणच्या कर्मचार्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन, पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे अंधाराचा सामना करत असलेल्या ग्रामस्थांना तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी हे रोहित्र बदलण्याची मोहीम हाती घेतली. या कर्मचार्यांनी ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी व ग्रामस्थांना अंधारातून उजेडात आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता, पाऊस सुरू असतानासुद्धा कर्मचार्यांनी विद्युत रोहित्र बदलून नवीन रोहित्र बसवले, व वीज पुरवठा सुरळीत करून दिला. त्यामुळे बिबीसह परिसरातील गावांची वीज आली व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कर्मचार्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल ग्रामस्थांनी कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.