बुलढाणा लोकसभेसाठी शिवसेनेने (ठाकरे) कंबर कसली; मंगळवारी मुंबईत महत्वपूर्ण बैठक
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार मतदारसंघाचा आढावा
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या बंडखोरीमुळे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात असलेल्या लाटेचा पुरेपूर राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न शिवसेना (ठाकरे) पक्षाने चालविला असून, या मतदारसंघातून जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी जोरदार तयारी चालवली आहे. महाविकास आघाडीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असला तरी, हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तो शिवसेनेला हवा आहे. त्या दृष्टीने मंगळवारी (दि.२२) मुंबईत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मतदारसंघाचा दुपारी साडेबारा वाजता आढावा घेणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन आमदार व स्वतः खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात गेले आहे. त्यामुळे या बंडखोरांविरोधात शिवसैनिकांत संतापाची लाट आहे. तसेच, जिल्ह्यातील जनमतदेखील त्यांना अनुकूल नाही. या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर निवडणुकीसाठी वर्षभरापूर्वीच कामाला लागले असून, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असले तरी, खेडेकरांना ती शिवसेनेला हवी आहे. तसेच, स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील या जागेसाठी महाविकास आघाडीत आग्रही आहेत. त्या दृष्टीने मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी व रणनीती आखण्यासाठी मंगळवारी (दि.२२) दुपारी साडेबारा वाजता मुंबईत मातोश्री निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी आमदार आणि नेते यांना पाचारण करण्यात आलेले आहे.
देशातील २६ राजकीय पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ३२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा आजपर्यंत पूर्ण होणार आहे. उद्धव ठाकरे आज सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील. तर उर्वरित १६ मतदारसंघांच्या आढाव्याचा दुसरा टप्पा २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.