‘आरएल ज्वेलर्स’वर तब्बल ४० तास छापेमारी, ५० किलो सोने जप्त!
UPDATE :
जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी धाड प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ईडीने या प्रकरणात 24 कोटी 7 लाखांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाखांची रक्कम जप्त केली आहे. ईडीने मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि जळगावमध्ये धाडी टाकल्या होत्या. जैन यांच्या 50 कोटींच्या 60 मालमत्तांची कागदपत्रेसुद्धा ईडीने आपल्या हाती घेतले आहेत. ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
– आम्ही हिंमत हरलो नाही – माजी आ. मनिष जैन
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खजिनदार, माजी राज्यसभा खासदार ईश्वर बाबूजी जैन आणि माजी विधानपरिषद आमदार मनीष जैन या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद (आरएल) ज्वेलर्ससह अन्य काही ठिकाणी ईडीने दोन दिवस छापे घातले. काल, तब्बल ४० तासानंतर ईश्वरलाल ज्वेलर्स म्हणजे आरएल ग्रुपवरील ईडीची कारवाई संपली. या कारवाईत ५० किलो सोने जप्त करण्यात आल्याची माहिती हाती आली असून, मोठे घबाडही ईडीच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्रातील मोदी सरकारने दिलेला झटका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ईडीने गुरुवारी ईश्वरलाल ज्वेलर्सवर छापेमारी केली होती. विशेष म्हणजे, या छापेमारीची अख्खा दिवस कुणालाच गंधवार्ता नव्हती. दुसर्या दिवशी या छापेमारीची माहिती बाहेर आली. त्यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली. काल रात्री ईडीचे अधिकारी ज्वेलर्स शॉपमधून निघून गेले. जळगावाच्या इतिहासातील ईडीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्भात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसला होणारी फंडिंग तसेच अन्य महत्त्वपूर्ण दस्तावेजांची चौकशी करण्यात आल्याचीही माहितीही सूत्राकडून कळली आहे. त्यामुळे ही कारवाई शरद पवारांच्या आर्थिक रसदीवर घाव घालण्यासाठी करण्यात आली काय?, अशी चर्चा राजकारणात रंगली आहे. दरम्यान, या कारवाईने आम्ही हिंमत हरलो नाही. आमच्या शुद्धतेवर लोकांचा विश्वास आहे. आम्ही राखेतून पुन्हा भरारी घेऊ, असा विश्वास माजी आमदार मनिष जैन यांनी व्यक्त केला. ईश्वरलाल जैन यांनीही मी गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचं समर्थन करत आलो आहे. पवार साहेबांवर माझा विश्वास असून यापुढेही त्यांचे समर्थन करत राहील. ईडीच्या छापेमारीने मी विचलीत होणार नाही, असं म्हटलं आहे.
ईडीने जळगावसह नाशिकमधील सहा कंपन्यांवर गुरुवारी सकाळी छापेमारी केली होती. काल पहाटे ४ वाजेपर्यंत या सर्वच ठिकाणी चौकशी सुरू होती. या चौकशीचा तपशील अद्याप स्पष्ट झाला नाही. पण कोणत्यातरी राजकीय कारणापोटी ही चौकशी झाल्याची माहिती कळली आहे. १७ ऑगस्टला ईडीने सकाळीच एकाचवेळी नाशिक, ठाणे, जळगाव या ठिकाणी आर.एल. ग्रूपवर छापेमारी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आरएल ग्रुपच्या ज्वेलर्सच्या बाहेर जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुणालाही आत येण्यास आणि आतील लोकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. पोलिसांनाही या छापेमारीची गंधवार्ता नव्हती. तब्बल ४० तासाहून अधिक वेळेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या झाडाझडतीनंतर ईडीच्या अधिकार्यांनी आर. एल. समूहाकडून दागिने, रोकड, तसेच महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे जप्त केल्यानंतर ईडीचे अधिकारी काल अडीच वाजता रात्री निघून गेले. या कारवाईसाठी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांतून ईडी पथकाच्या १० गाड्या गुरुवारी एकाचवेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. या पथकांनी माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या जळगाव व नाशिक येथील एकूण ६ फर्म्सवर छापे घातले. या प्रकरणी ईडीसह प्राप्तिकर विभागानेही चौकशी केली.