बुलढाणा (राजेंद्र काळे) – ‘ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास..’ याप्रमाणे या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतला होता, त्या शब्दाला दादांनी जागून राज्य सहकारी बँकेमार्फत सॉफ्ट लोन प्रस्तावाप्रमाणे निधी मंजुरातीचा मार्ग मोकळा केला आहे. आ. शिंगणे यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बुधवार, दि. २६ जुलै रोजी सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेने सामान्य शेतकरी व ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या हाताला काम कसे पुरवता येईल, व ‘सबका साथ सबका विकास’ खरोखर कशाप्रकारे साध्य करता येईल, या अनुषंगाने विविध आर्थिक गटातील सर्वसामान्यांना अगदी कमी व्याजदराने कर्ज देऊन व्यवसायवृद्धीच्या आधारे जिल्हा बँक व पर्यायाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एक दशवार्षिक योजना तयार केली आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील विविध आर्थिक विकास संस्था व महामंडळे यांच्या सहकार्याने सर्वसामान्यान्चा व पर्यायाने जिल्हा बँकेचा सर्वसमावेशक विकास अभिप्रेत आहे, जिल्हा बँकेच्या या योजनेकरिता आवश्यक असलेले आर्थिक सहाय्य जर जास्त व्याजदराने प्राप्त झाले तर सर्वसामान्यांना त्याचा भुर्दंड जास्त व्याजदर अदा करून चुकवावा लागेल, असे होऊ नये म्हणून जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने त्यांच्या व्यवसाय वाढीच्या योजनेसाठी शासनाने बिनव्याजी प्रत्यक्ष रक्कम बँकेला द्यावी, किंवा राज्य सहकारी बँकेने जर रक्कम दिली तर त्याला शासनाकडून विनाअट थकहमी मिळावी, यासाठी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून २०२० लाच ३०० कोटी रुपयाचे बिनव्याजी किंवा कमी व्याजदर असलेले सॉफ्ट लोन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु कोरोना कालावधी व राज्यातील सत्ताकारणातील विविध घडामोडीमुळे अद्याप त्याला मंजुरात मिळाली नव्हती. आ. राजेंद्र शिंगणे यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता, त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, जिल्हा बँकेने सादर केलेल्या प्रस्तावासंबंधी विचार करण्यासाठी नवनियुक्त अर्थमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्राच्या दालनामध्ये त्वरित बैठक बोलावून त्यासंबंधी सहकार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आ. राजेंद्र शिंगणे यांचेसोबत प्रदीर्घ चर्चा करून सादर केलेल्या प्रस्तावाला त्वरित मंजुरात मिळावी, यासाठी संबंधिताना आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे बर्याच काळापासून जिल्हा केंद्रीय बँकेच्या ३०० कोटीच्या सॉफ्ट लोनच्या प्रस्तावाला मंजुरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
https://breakingmaharashtra.in/mla_shinge_with_ajit_pawar/
बुलढाणा जिल्हा बँकेच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन, बुलढाणा केंद्रीय सहकारी बँकेने मागील आर्थिक मदत मिळाल्यानंतर आतापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनामुळे रिझर्व बँकेच्या विविध निकषांचे अपेक्षेप्रमाणे पालन केलेले आहे. रिझर्व बँकेने घालून दिलेला भांडवलं पर्याप्तता गुणोत्तरासह सर्व निकषाची पूर्तता जिल्हा बँकेने केलेली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेला अधिक मजबूती मिळून अधिक सक्षमपणे जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर गरजेनुसार कर्ज उपलब्ध होण्याकरिता जिल्हा बँकेने सादर केलेल्या ३०० कोटीच्या सॉफ्ट लोन प्रस्तावाप्रमाणे राज्य सहकारी बँकेने निधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्याला शासनाची विनाअट थकहमी मिळावी, याकरिता राज्य सहकारी बँकेने शासनाकडे त्वरित प्रस्ताव सादर करावा, यासाठी राज्य सहकारी बँकेला सुचित करण्यात आले आहे जेणेकरून १५ ऑगस्ट पूर्वीच विनाअट थकहमीचा निर्णय शासनास घेता येईल, व पुढील १५ ते २० दिवसात जिल्हा बँकेला ३०० कोटीचे बिनाअट कर्ज बँकेला मिळू शकेल.
उपमुख्यमंत्री यांच्या दालनात झालेल्या या सभेला जिल्ह्यातील माजी मंत्री आ. संजय कुटे हेदेखील उपस्थित होते. आ. शिंगणे यांचेसोबत जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक खरात तसेंच जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे अनुषंगाने बँकेच्यावतीने उपस्थित होते तर सहकार विभागाच्यावतीने सहकार सचिव राजेशकुमार यांचेसह सहकार आयुक्त संतोष पाटील व इतर मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.
————–