खामगावकरांना कोट्यवधींचा चुना? चांगला रस्ता उखडून भरपावसाळ्यात सिमेंटचा बनविणे सुरु!
– माजी पालकमंत्री आणि मुख्याधिकार्यांविरोधात संतापाची लाट?
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र) : खामगाव शहरात भरपावसात चांगला रस्ता उखडून सिमेंटचा रस्ता बनवला जात असून, यानिमित्ताने खामगावकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. दुसरीकडे, आठ नंबर नगरपालिका शाळेतील मैदानावरच सभागृहाचे बांधकाम केले जात असून, त्यामुळे शाळेतील मुलांना खेळण्यासाठीच मैदान उरणार नाही. बालकांच्या खेळण्याच्या हक्कावर गदा आणली जात आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या आशीर्वादाने, तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या मनमानीपणातून हे प्रकार सुरु असल्याची खामगाव शहरात चर्चा होत असून, तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे.
खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासकामांचा झपाटा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते सिद्धिविनायक गणपती मंदिरपर्यंतचा डांबरीकरणाचा रस्ता कंत्राटदार मोहन भागदेवांनी बनविला होता. अत्यंत सुस्थितीत असलेला हा रस्ता पुन्हा एकदा बांधण्यात येत असल्याचा चमत्कार कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे, असा सवाल उपस्थित होतो. या रस्त्यावर आता ५६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, भरपावसाळ्यात या रस्त्याचे खोदकाम सुरू करण्यात आले आणि आता हा रस्ता डांबरीकरणऐवजी सिमेंटचा बनवण्यात येत असल्याची माहिती आहे. अत्यंत सुस्थितीत असलेला हा रस्ता पुन्हा का बनवण्यात येत आहे, याबाबत शंकाकुशंकांना पेव फुटले आहे.
त्याच प्रमाणे लहान मुलांच्या खेळण्या बागडणासाठी असलेल्या शाळा क्रमांक आठमध्ये सभागृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामामुळे शाळेतील बालकांना खेळण्यासाठी उपलब्ध होणारे मैदान पूर्णपणे नाहीसे झाले आहे, हादेखील चमत्कार कुणाच्या आशीर्वादाने केला जात आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. बालकांचे बालपण हिरवण्यासाठी प्रयत्न करणार्यांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा यानिमित्ताने नागरिकांनी केली आहे. एवढेच नाही तर या प्रभागात दोन उद्याने नाल्याच्या शेजारीच बनविण्यात येत आहेत. ६५ लाख रुपये खर्चाचे हे बगीचे नाल्याला पूर आल्यास वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.
सर्वसामान्य नागरिक नगरपरिषदेचा विविध रूपाने कर भरतो, त्या कराची विल्हेवाट अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावण्याचा घाटही मुख्याधिकार्यांनी रचला असल्याचा संशय बळावला आहे. सहा महिन्यापूर्वीच या प्रभागातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा रस्ता बनविण्यात आला होता. एवढेच नाही तर हा रस्ता खराब झाला म्हणून राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी तक्रार केली होती. त्यानंतर नगरपालिकेच्यावतीने सदर रस्त्याची डागडुजी करण्यात येऊन, हा रस्ता गुळगुळीत बनविण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा हा रस्ता आता सिमेंटचा बनविण्यात येत आहे. शहरातील अनेक रस्ते व त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असताना, याच रस्त्यावर लाखो रुपयाचा खर्च का? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.