– कोरोमंडल एक्स्प्रेस-मालगाडीची समोरासमोर धडक; इंजिन थेट मालगाडीवर चढले!
बालासोर (ओदिशा) – ओदिशा राज्यातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसने मालवाहू गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण रेल्वे अपघातात हे वृत्तलिहिपर्यंत ५० प्रवासी ठार तर साडेतीनशेपेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्देवी घटना घडली. अपघात इतका भीषण होता, की एक्स्प्रेसचे इंजिन मालगाडीवर चढले होते. तर ८ डबे रूळावरून खाली घसरले होते. दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याने हा प्रकार घडला. या अपघाताचे बचाव व मदत कार्य सुरू असताना लगेचच दुसरादेखील रेल्वे अपघात घडला. बालासोरच्या जवळच बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट गाडीचे काही डबे रूळावरून खाली घसरले. तेथेदेखील मदत व बचाव कार्य सुरू असून, मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. जखमी प्रवाशांना बहानागा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
https://twitter.com/i/status/1664666912230604800
ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत व बचावकार्याची पाहणी केली. प्रशासनाने तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, ६७८२२६२२८६ हा संपर्क क्रमांक सक्रीय करण्यात आला आहे. या अपघातामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्देवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मदत व बचाव कार्याच्या सूचना केल्या आहेत.
—-
https://twitter.com/i/status/1664690654944047104