BULDHANAChikhaliVidharbha

हे देणारे सरकार; मायबाप जनतेला थेट लाभ पोहचवण्याचे महायुती सरकारचे धोरण – आ. श्वेताताई महाले

चिखली (तालुका प्रतिनिधी) – गेल्या वर्षी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्तारूढ झालेल्या भाजपा – शिवसेना युतीचे शिंदे – फडणवीस सरकार हे घेणारे नव्हे तर ‘देणारे सरकार’ आहे. मायबाप जनतेला शासकीय योजनांचे लाभ थेट पोहोचवण्याचे धोरण या सरकारचे आहे. मागील सरकारने सर्व लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी थांबवली होती. मात्र, सध्याच्या सरकारने या अंमलबजावणीला गती दिली असून, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान सुरू करण्यात आले आहे, असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. या अभियानाच्या माध्यमातून चिखली तालुक्यातील सर्व गरजू लाभार्थींना लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थांमध्ये दि. २७ मे रोजी झालेल्या ‘ शासन आपल्या दारी ‘ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. तालुक्यातील शेतकरी, महिला, युवक, दिव्यांग, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आदी विविध शासकीय योजनांच्या हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थितीमुळे हे अभियान यशस्वी झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष पवार, तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी भारसाकळे, मुख्याधिकारी अजय कुरवाडे, तालुका कृषी अधिकारी अमोल. शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, देवीदास जाधव, जिल्हा सचिव आनंदराव हिवाळे, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे शहराध्यक्ष सागर पुरोहित, शेख अनीस, अमोल साठे, सुनील पोफळे, सिंधूताई तायडे, अर्चना खबुतरे आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.


आमदारांनी ठेवले एजंटगिरीवर बोट!

‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून हाती घेतले आहे; चिखली तालुक्यात तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय यंत्रणांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून त्यांचे कौतुक आणि प्रशंसा केली. या कार्यक्रमानंतर वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांच्यादेखील याद्या तयार करून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न व्हावा, असे निर्देश आ. महाले यांनी दिले. ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी बांधव आपल्या कामासाठी चिखलीला येतात; तहसील कार्यालय असो पंचायत समिती असो की कृषी विभाग असो वेगवेगळ्या ठिकाणी ते आपली कामे घेऊन जातात परंतु, काही कारणास्तव अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांची कामे होऊ शकत नाहीत. अशा प्रसंगी या कार्यालयाच्या आवारात असलेले कथाकथित एजंट या गरजू लोकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळून काम करण्याचे खोटे आश्वासन देतात. हा घातक पायंडा प्रशासनाला वाळवीसारखा पोखरत असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास देखील उडत चालला आहे, असे आ. श्वेताताई महाले म्हणाल्या. या एजंटगिरीला ताबडतोब आळा बसावा यासाठी शासकीय अधिकार्‍यांनी पावले उचलावी असे निर्देशदेखील श्वेताताई महाले यांनी यावेळी बोलताना दिले. उपस्थितांमधूनदेखील या त्यांच्या वक्तव्याला टाळ्यांच्या रूपाने प्रतिसाद मिळाला.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!