सुनील चांगाडेची मृत्युशी झुंज संपली; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात काहीकाळ ठिय्या!
– रंगपंचमीच्या दिवशी झाला होता प्राणघातक हल्ला
– पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार
मेहकर (अनिल मंजुळकर) – जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळंबेश्वर हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. या गावात रंगपंचमीच्या दिवशी दारूची पार्टी रंगली असता, जुन्या वादाची आठवण काढत सुनील चांगाडे याला बेदम मारहाण झाली होती. डोक्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे दवाखान्यात दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. पण् अखेर सुनील वामनराव चांगाडे याची ससून हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. आज सकाळी पोलीस ठाण्यात रुग्ण वाहिकेसह नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन पुकारत तातडीने आरोपींना जेरबंद करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ठाणेदाराची तारांबळ उडाली होती. परंतु, पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रंगपंचमीच्या दिवशी कळंबेश्वर या गावात डोक्यात मारुन जखमीं केल्याची घटना घडली होती. या दिवशी सायंकाळी सात वाजेपासून गैरअर्जदार व त्यांच्यासोबत सुनील चांगाडे हे सर्वजण पार्टी करण्यासाठी निघून गेले. सुनील रात्री घरी आला नाही, असा विचार कुटुंबीय करत असतानाच गैरअर्जदार घरी येऊन तुमचा मुलगा सुनील चांगाडे हा गावातीलच डॉ. पंकज बोराडे यांच्या दवाखान्यात भरती केले आहे. तुम्ही लवकर भेटण्यासाठी जा व कुटुंबीय भेटण्यासाठी गेले असता डॉक्टरांनी सांगितले की, तुमच्या मुलाला डोक्यात गंभीर मार आहे व बेशुद्ध अवस्थेत होता. मेहकर येथील डॉ. देशमुख यांच्या दवाखान्यात भरती केले. त्यांनीसुध्दा लवकर छत्रपती संभाजीनगरला घेऊन जायचा सल्ला दिला. नंतर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यापासून उपचार होते. पण काल दुपारी दोन वाजता सुनील चांगाडेची प्राणज्योत मालवली. आणि आज सकाळी जानेफळ पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन करुन इतर आरोपीला अटक व्हावी व गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी ठाणेदार प्रविण मानकर यांना सांगण्यात आले. ठाणेदारांनीसुध्दा समजूत काढून नातेवाईकांना अंत्यविधीसाठी रवाना केले. या घटनेने कळंबेश्वर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
————–