– ‘झेडपी’च्या सीईओ भाग्यश्री विसपुते प्रभारी जिल्हाधिकारी
बुलढाणा (संजय निकाळजे/ बाळू वानखेडे) – मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ८ मे ते २ जून या कालावधीत प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकार्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले असून, या प्रशिक्षणासाठी देशभरातील आयएएस अधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात राज्यातील १८ आयएएस अधिकारी या प्रशिक्षणासाठी रवाना झाले असून, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांचीही या प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने तेही मसुरीला रवाना झालेले असून, पुढील २४ दिवसांकरिता जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे राहणार आहे.
आयएएस अधिकार्यांसाठी घेतला जाणारा मिड करिअर फेज-४च्या प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांची निवड झाली होती. त्यामुळे एक महिन्यासाठी ते मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे ८ मे २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी हा पदभार स्वीकारला आहे. पुढील २४ दिवस आता भाग्यश्री विसपुते याच जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय अशा दोन्ही कार्यालयांचा पदभार संभाळणार असून, बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण प्रशासकीय सूत्रे त्यांच्या हाती असणार आहेत.
—————