बुलढाणा (खास प्रतिनिधी) – ज्याने-त्याने त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात काम करत असतांना, आपले काम समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने केले तर त्या कार्यात वेगळेपण येवून समाज त्याची दखल घेत असतो. त्याच समाजाकडून मिळणारी कौतुकाची थाप, ही पुन्हा समाजकार्याची प्रेरणा देणारी ठरत असल्याच्या भावना जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत कोठे यांनी व्यक्त केल्या. ‘वृत्तदर्पण ९०० सन्मान’ व जिल्हाभूषण पुरस्कार्थींच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते.
महाराष्ट्र दिनी म्हणजेच सोमवार १ मे रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार राजेंद्र काळे हे दैनिक देशोन्नतीमध्ये १८ वर्षांपासून ‘वृत्तदर्पण’ हे सदर नियमीतपणे दर सोमवारी चालवत आहे, त्याचा ९००वा भाग सोमवार १ मे रोजी आला. त्यानिमित्त या सन्मान सोहळ्याचे आयोजन अॅड.जयसिंगराजे देशमुख व भाऊ पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी जिल्हाभुषण पुरस्कारप्राप्त सुनिल शेळके व प्रा.सुनिल सपकाळ यांचाही सत्कार करण्यात आला. तर काँग्रेसचे जेष्ठ नेते मुख्त्यारसिंगभाऊ राजपूत यांचे ७५व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
या सोहळ्यात सामाजिक व राजकीय मान्यवरांनी भावना व्यक्त करतांना घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी कार्य करणार्या व्यक्तींना जपण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते जपले पाहिजे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत कोठे होते तर बारोमासकार सदानंद देशमुख, माजी आमदार विजयराज शिंदे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड व विजय अंभोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, ओमसिंग राजपूत, काँग्रेसचे विजय अंभोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, शिवाजीरावराजे जाधव, डॉ.गणेश गायकवाड, बाबासाहेब भोंडे, जगदेवराव बाहेकर, हारूण मास्टर, डॉ.राजेंद्र वाघ, सिध्देश्वर पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना पत्रकार राजेंद्र काळे यांनी ‘वृतदर्पण’च्या प्रवासाबद्दल माहिती सांगत वाचकांकडून त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगितले. सुनिल सपकाळ यांनी गोरगरीब व गरजू माणसांना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहर्यावरील समाधान पाहून होणारा आनंद हा कुठेतरी विकत घेता येत नाही, असे सांगितले. अभिता कंपनीचे संचालक सुनिल शेळके यांनी ‘परिनिर्वाण’ चित्रपटातून बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचे ज्या नामदेव व्हटकर यांनी चित्रण केले त्यांचे जीवनचरित्र पुढे आणण्याचा छोटासा प्रयत्न होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, महिला व तरूणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक अॅड. जयसिंगराजे देशमुख यांनी सूत्रसंचालन गजेंद्रसिंह राजपूत यांनी आभार प्रदर्शन प्रा.विजय घ्याळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवजयंती उत्सव समिती तसेच भाऊ पाटील ग्रूप बुलडाणा यांनी परिश्रम घेतले. तब्बल ३ तास हा कार्यक्रम वैचारिक पटलावर रंगत गेला.
—————–