BULDHANAHead linesLONARVidharbha

लोणारला जोडणार्‍या रस्त्याचे निकृष्ट काम; पिंपरी खंदारे येथील तरुणाचे अमरावतीत अर्धनग्न उपोषण

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – औरंगाबाद – नागपूर महामार्गावरील लोणार सरोवर या जगप्रसिध्द खार्‍यापाण्याच्या सरोवराला जोडणार्‍या रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे झाल्याने ते विहित मूल्यांकनाप्रमाणे उत्कृष्ट व्हावे. तसेच, ठेकेदाराला पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी पिंपरी खंदारे येथील तरुण परमेश्वर उगलमुगले यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या उपोषणाने अमरावती बांधकाम विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

औरंगाबाद ते नागपूर महामार्गावर असणार्‍या पिंपरी खंदारे येथून लोणार सरोवर या ठिकाणाला जोडणार्‍या आखूड पल्ल्याच्या रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे झाले आहे, व विहित मूल्यांकनाप्रमाणे झालेले नाही. याबाबत त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देवून व वैयक्तिक भेटी घेऊन सदर प्रकार त्यांच्या कानावर घातला होता. परंतु गेंड्यांची कातडी पांघरलेल्या अधिकार्‍यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे उगलमुगले यांनी उपोषणसुद्धा केलेले आहे. त्यावेळी संबंधित अधिकारी बी. एन. काबरे यांनी सदरील काम विहित मूल्यांकनाप्रमाणे करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते व उपोषण सोडण्यात आले होते. परंतु त्यांचे शाखा अभियंता श्री वाघ व त्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालत दिलेल्या मुदतीत हे काम चांगल्या दर्जाचे केले नाही.

उलट उगलमुगले यांनी त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतल्याची गावकर्‍यांमध्ये अफवा पसरवली व त्यांचे उपोषण हाणून पाडण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांनी त्यांचा संघर्ष जारी ठेवत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालया समोर अमरावती येथे अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणात त्यांनी रस्त्याचे काम दर्जेदार तथा विहित मूल्यांकनाप्रमाणे व्हावे, यासह झालेल्या कामाची गुणवत्ता चाचणी, कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई व त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या व चालू असलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणीसुद्धा केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!