अखेर हरभरा खरेदीचा प्रश्न मार्गी; दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होणार!
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्ताची सरकार पातळीवर गांभीर्याने दखल!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा जिल्ह्यासाठी नाफेड़ला दीड़ लाख क्विंटल हरभरा खरेदीचे अतिरिक्त उद्दिष्ट राज्य सरकारकडून २७ एप्रिल रोजी मिळाले आहे. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सर्वप्रथम आवाज उठवत वृत्त प्रसारित केले होते. त्याची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून, हरभरा खरेदीचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरीवर्गाने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दूरध्वनीद्वारे धन्यवाद दिले आहेत.
शासन दरवर्षी नाफेड़मार्फत हरभर्याची ५३३४ रूपये प्रतिक्विंटल या हमी दराने शासकीय खरेदी करते. त्यासाठी प्रथम शेतकरी ऑनलाईन नावनोंदणी करतात. बाजारापेक्षा जास्त भाव असल्याने यावर्षीही बहुतांश शेतकर्यांनी नाफेड़कड़े हरभरा नोंदणी केली होती. खरेदी सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच जिल्ह्याचे सहा लाख ६१ हजार क्विंटल हरभरा खरेदीचे टार्गेट पूर्ण झाल्याचे सांगत, १० एप्रिलपासून हरभरा खरेदी अचानक बंद करण्यात आली तर पोर्टलही बंद पड़ले होते. जिल्ह्यातील १३ शासकीयसह एकूण ७२ खरेदी केंद्रावर सदर हरभरा खरेदी करण्यात आला होती. अचानक खरेदी बंद झाल्यामुळे शेतकरी भांबावला तर काही खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा तशाच उभ्या होत्या. यामुळे नोंदणी केलेल्या शेतकर्यांची पंचाईत झाली होती. याबाबत ब्रेकिंग महाराष्ट्रने ‘नाफेड़ची खरेदी बंद’ म्हणे टार्गेट फुल्ल; पोर्टलही बंद!’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच शासन खड़बड़ून जागे झाले, व प्रशासकीय स्तरावर मिटिंगांवर मिटिंगा झड़ल्या. अखेर केंद्र शासनाने बुलढाणा जिल्ह्यासाठी एक लाख ४७ हजार २९६ क्विंटल अतिरिक्त हरभरा खरेदीला दि.२७ एप्रिलरोजी मंजुरी दिली आहे. यामध्ये नोंदणी केलेल्या व एसएमएस पाठविलेल्या शेतकर्यांचा हरभरा प्राधान्याने खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या शेतकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोड़ला आहे.
यामध्ये जिल्ह्यासाठी आठ स्टेटस नोड़ल एजन्सीना खरेदीचे अतिरिक्त उद्दिष्ट वाटून देण्यात आले आहे. दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाकड़े केली होती. यासाठी अपर मुख्य सचिव सहकार व पणन यांनीही केंद्रीय कृषी सचिव यांचेकड़े पाठपुरावा केला. तसेच एम. जी. काकड़े, ड़ीएमओ बुलढाणा यांनी याबाबत मागणी केली होती. बुलढाणासह अकोला, अमरावती, हिंगोली, वाशिम, यवतमाळ व जालना या शेतकरी आत्महत्याग्रस्तासह कोरड़वाहू भाग असलेल्या जिल्ह्यासाठीसुध्दा हरभरा खरेदीचे अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.
येथे वाचा हरभरा खरेदीचा शासकीय आदेश