मेहकर बाजार समिती निवडणुकीत भाजपसोबत दगाफटका; शब्द देऊनही जागा सोडल्या नाहीत!
– शिंदे गट-भाजपचे स्थानिक पातळीवर फाटले, महाविकास आघाडीला होणार फायदा?
मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात फाटल्याचे चव्हाट्यावर आले असून, शिंदे गटाने दगाफटका केल्याचा आरोप भाजपचे नेते अॅड. शिव ठाकरे पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत केला आहे. या दोघांचे फाटल्याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता वर्तविली जात असून, शिंदे गटाने शब्द देऊनही जागा सोडल्या नाहीत, असा आरोप भाजपने केला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत बघायला मिळत असून, तालुक्यातील मित्र पक्ष म्हणून घेत भाजपला शिवसेना (शिंदे गट) यांनी राजकीय मैत्रीचा विश्वासघात केल्याचा आरोप अॅड. शिव ठाकरे यांनी केला. या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपाला दोन जागा देणार असल्याचे खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना व मेहकरमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांना शब्द दिला होता. पण शिंदे गटाच्या शिवसेनेने ऐनवेळी धोका देऊन भाजपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बाहेर टाकल्याने भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होणार असल्याचे बोलल्या जात आहे. महाविकास आघाडीसुध्दा जोमाने रिंगणात उतरली असल्याने शिंदे गटाला ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे जाणकार बोलत आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हादअण्णा लष्कर, आध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष ठोकळ महाराज, भाजपा शहर अध्यक्ष अक्षत दीक्षित, भाजपचे अॅड. रजनीकांत कांबळे, चव्हाण मामा, देवकर मामा, चंदन अडेलकर, राजुभाऊ नवले जिल्हा कार्कारिणी सदस्य राहुल मानवतकर, व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.