बुलढाणा (खास प्रतिनिधी) – तालुक्यातील धाड नगरीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने धाडच्या विविध भागात लावलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे गेल्या वर्षांपासून बंद पडलेले असल्याने गावाची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. त्यामुळे उपरोक्त कॅमेरे पूर्ववत सुरु करण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. ग्रामपंचायतच्या मासिक सभेत या संदर्भात बहुमतात ठराव पारीत झाला. प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. मात्र, नेहमीप्रमाणे श्रेयवादासाठी विद्यमान सरपंचानी उपरोक्त कामात खोडा घातल्याने सुरु झालेले काम पुन्हा रखडल्याची चर्चा गावात सुरू आहे.
धाड नगरीचा भौगोलीक विस्तार, वाढती लोकसंख्या, कायदा व सुव्यवस्थेची जबादारी सांभाळणार्या पोलिसांचे अपुरे संख्याबळ, समाजकंटकांकडून वारंवार होणारे उपद्रव, चोरी, घरफोडी तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने धाड शहरातील संवेदनशील समजल्या जाणारे चौक व परिसरात ६६ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले होते. या कॅमेर्यांमुळे समाजकंटकांच्या उचापती कमी होवून गुन्हेगारीलाही बर्यापैकी लगाम लागला होता. मात्र, देखभालदुरुस्तीअभावी गेल्या काही वर्षांपासून सर्वच कॅमेरे पूर्णत: बंद पडल्याने धाडच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे सदर कॅमेरे तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. तसेच कॅमेरे पूर्ववत सुरु न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
विधायक व सकारात्मक कामाचा ध्यास घेतलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतच्या मासिक सभेत कॅमेरे सुरु करण्याचा ठराव बहुमतात पारीत केला आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी बोबडे यांनी ‘सीसीटीव्ही’कॅमेरे सुरु करण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. ही बाब लक्षात येताच विद्यमान सरपंचांनी या कामात खोडा घातला, अशी चर्चा होत आहे. ‘मला न विचारता तुम्ही काम कसे सुरु केले’, काम बंद करा, नंतर बघू’, असे म्हणून सदर काम बंद पाडल्याची चर्चा ग्रामपंचायत वर्तुळात जोरदार सुरू आहे. पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही बाब गांर्भीयाने घेवून घडलेल्या प्रकाराची चौकशी करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
‘प्रहार’आंदोलनाच्या पवित्र्यात!
दरम्यान, गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समजले जाणारे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तात्काळ सुरु करण्याची मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या मासिक सभेत ग्रा.पं.च्या काही सदस्यांनी बहुमतात कॅमेरे सुरु करण्याचा ठरावदेखील मंजूर करुन घेतला. नव्हे तर कॅमेरे सुरु करण्याच्या कामाला प्रत्यक्षता सुरुवातदेखील झाली. मात्र, राजकीय श्रेयवादासाठीपोटी उपरोक्त काम बंद पडल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.