बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या ९ एप्रिलरोजी झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुखसह इतर गावातील कांदा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कांदा बीजोत्पादक शेतकरी पूर्णतः नेस्तनाबूत झाला आहे. तरी सदर नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
याबाबत मेहकरचे तहसीलदार संजय गरकल यांना मेहकर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका संपर्कप्रमुख गोपल सुरड़कर यांनी १० एप्रिलरोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ९ एप्रिलच्या रात्री नायगाव देशमुख, देऊळगाव साकरशा, पारखेड़, मोहना बुद्रूक, मांड़वा, घाटबोरी परिसरात गारपीट व तुफान अवकाळी पाऊस पड़ला. या पावसामुळे विविध पिकांसह कांदा पूर्णतः झोपला असल्याने कांदा बीजोत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. चांगले उत्पादन व हमखास भाव यामुळे मोठा खर्च करून शेतकरी या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड़ करतात. परंतु गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, नायगाव देशमुख परिसरात तर जवळजवळ शंभर हेक्टरचेवर कांदा बीजोत्पादनाचे नुकसान झाले आहे. तरी सदर नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
————–