सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे राज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त ०१ एप्रिल २०२३ ते ०१ मे २०२३ या कालावधीदरम्यान‘सामाजिक न्यायपर्व’ साजरे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली. सालाबादप्रमाणे यंदाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूरमार्फत या कालावधीत विविध समाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत.
महात्मा फुले जयंती निमित्त अवयव दान विषयावर व्याख्यान, जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देणे, कै.लक्ष्मीबाई पाटील मुलींचे वसतीगृह सोलापूर येथे ‘१८ तास अभ्यास करणे’ उपक्रम घेणे, रक्तदान शिबीर आयोजन करणे, जेष्ठ नागरिकांचे व उसतोड कामगारांचे मेडिकल कॅम्प आयोजित करणे, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे सत्कार करणे आदी उपक्रम समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हयातील शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सर्व गट विकास अधिकारी, तहसीलदार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना आवश्यक ती कार्यवाही करणेकरीता सूचना देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.