देशातील १३ राज्यांत दोन वर्षे राबविणार ‘राष्ट्रगौरव छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक अभियान’!
– दोन वर्षांत होणार प्रमुख राज्यांतून ११ हजार किलोमीटरचा प्रवास, नवी दिल्लीत समारोप
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाच्या निमित्त ‘राष्ट्रगौरव छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक अभियान’ राबविले जाणार आहे. देशातील १३ राज्यांमध्ये हे अभियान सुमारे दोन वर्षे राबविले जाणार असून, यामध्ये महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा, शिवाजी महाराजांचा इतिहास, जगद्गगुरू तुकाराम महाराज गाथा पारायण, कीर्तन, समाजसुधार साहित्य, लोकगीते, पोवाडा, गोंधळ, कुस्ती आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रचार काररथाची तयारी सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय बसव छत्रपती अभियानाचे जनार्धन महाराज पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, शिवनेरी किल्ल्यावरून या अभियानाची सुरुवात होणार असून तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. तर दिल्ली येथे या अभियानाची सांगता होईल. दोन वर्षे हे अभियान राबविले जाणार असून, ११ हजार किलोमीटरचा प्रवास असणार आहे. यावेळी देहू संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, दिलीपअण्णा मोरे महाराज, परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते. देहू संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे यांचा निवडीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार राष्ट्रीय बसव छत्रपती अभियानच्यावतीने करण्यात आला. यावेळी मोरे महाराज यांनी मार्गदर्शन केले.