– वनपरिक्षेत्रात सागवान तस्करी जोमात!
मेहकर (अनिल मंजुळकर) – राज्य सरकारने लाखों रुपये खर्च करून घाटबोरी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थान बांधले आहे. पण याठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी राहत नसल्याने ते धूळ खात पडल्याचे दिसून येत आहे. तसेच, या वनपरिक्षेत्रात सागवान तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातला असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यामध्ये राखीव वनक्षेत्रासोबत रोपवनला नेहमी आगीच्या घटना घडत असतात. आगीवर नियंत्रण ठेवायचे असेल, तसेच राखीव वनामधून अवैद्य वृक्षतोड थांबवायची असेल तर अधिकारी हे मुख्यालयी हजर राहणे आवश्यक आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजर राहात नसल्याने वृक्षतोड जास्त सुरू आहे. घाटबोरी गावाला लागूनच असलेल्या वाडी बीटमध्ये काही वनतस्करांनी सागवान झाडांची अवैध कत्तल करून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. तरी घाटबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी गाढ झोपेत असल्याचे दिसून येते. वृक्षतोड थांबवायची असेल तर वनपरिशेत्र अधिकारी पी.आर.तोंडीलायता यांनी घाटबोरी येथेच मुख्यालयी मुक्कामी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना शासनाने लाखो रुपये खर्च करून राहण्यास निवासस्थान बांधले आहे; पण आज सदर वास्तू शोभेची बनली आहे. यामध्ये शासनाने लाखों रुपये खर्च करून साहित्य खरेदी केली होती. ते साहित्य पण गायब दिसून येत असून, हे साहित्य स्वतः घरी नेले, की विक्री केली, की त्यांची चोरी झाली, या बाबीची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात दररोज वृक्षतोड जोमात सुरू असल्याने व अधिकारी मुक्कामी राहत नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून अधिकारी यांना शासकीय निवासस्थानी मुक्कामी राहण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी या परिसरातून जोर धरत आहे.